बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड कलाकार आता कंगनावर बंदी घालणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. या चर्चेवर चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांनी प्रतिक्रिया दिली. कंगनावर बंदी घालणं अशक्य आहे, तिला काम द्यावच लागेल असं मत त्यांनी व्यक्त केलं.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विक्रम भट्ट यांनी कंगना वादावर भाष्य केलं. “कंगना रणौत एक उत्तम अभिनेत्री आहे. कुठलीही व्यक्तिरेखा साकारता ती सखोल अभ्यास करते. निर्मात्यांना अशा महत्वाकांक्षी कलाकारांसोबत काम करायला आवडतं. त्यामुळे केवळ राजकीय मतभेदांमुळे कोणी कंगनावर बंदी वगैरे घालणार नाही. शिवाय कंगना एक नामांकित अभिनेत्री आहे. तिचे चित्रपट चालण्यासाठी कुठल्याही बॅनरची गरज नाही. ती स्वत: देखील चांगल्या चित्रपटांची निर्मिती करु शकते.” अशी प्रतिक्रिया विक्रम भट यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती. यावर कंगनानं ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचं ते उखडा’, असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबई विमानताळवर कंगना विरोधात घोषणाबाजी देखील केली होती.