News Flash

‘नि:शब्द’सारखा चित्रपट करण्यासाठी शाहरुख तयार?

आता माझे वय झाले आहे, असेही तो म्हणाला

शाहरुख खान

अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शाहरुख खानने या चित्रपटामध्ये साकारलेल्या मानसोपचार तज्ज्ञाच्या पात्राला म्हणजेच त्याच्या ‘जहांगीर खान’ या पात्राला प्रेक्षक दाद देत आहेत. या चित्रपटातील शाहरुख आणि आलियाच्या नॉन रोमॅण्टीक केमिस्ट्रीलाही प्रेक्षक पसंत करत आहेत. पण, या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा मात्र शाहरुख आणि आलिया एकाच चित्रपटामध्ये काम करणार आहेत हे ऐकून अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

‘डिअर जिंदगी’मधील शाहरुख आणि आलियाचे काम पाहता आता पुन्हा एकदा या दोघांनाही रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा प्रेक्षकांनीही व्यक्त केली आहे. बहुधा शाहरुखच्याही मनात असेच विचार येत आहेत. किंग खानने त्याबाबतचा विचारही केला आहे. ‘जर चित्रपटाच्या कथानकामध्ये तरुण मुलगा आणि वयोवृद्ध स्त्री पात्राची कथा असेल तर, कदाचित आम्ही ‘नि:शब्द’सारखा चित्रपट करु शकतो. पण, मला एखाद्या तरुण मुलाला लाजवेल किंवा किळसवाणे वाटेल अशी भूमिका मी साकारणार नाही’, असे म्हणत किंग खानने त्याचे नेहमीचे स्मितहास्य दिले. ‘नि:शब्द’ या चित्रपटामध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि आभिनेत्री जिया खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटामध्ये आपल्या वयापेक्षा इतक्या कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत काम केल्यामुळे बिग बींवर अनेकांनी टीका केली होती. दरम्यान ‘नि:शब्द’बद्दल पुढे बोलताना शाहरुख म्हणाला की, ‘आता माझे वय झाले आहे. पण, एक अभिनेता, एक व्यक्ती आणि आता एक मित्र म्हणून मला आलियासोबत निदान दोन किंवा त्यापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये एकत्र काम करायचे आहे. त्यामुळे त्या चित्रपटासाठी आम्ही अशाच कथानकाची निवड करु ज्यामध्ये वयाच्या मर्यादेमुळे काही अडथळे येणार नाहीत’.

दरम्यान ‘डिअर जिंदगी’मध्ये आलियासोबत काम करण्याविषयीची आठवण सांगताना शाहरुख म्हणाला की, ‘त्यावेळी अनेकांनी आमच्या एकत्र काम करण्यावर प्रश्नचिन्हसुद्धा उभे केले होते. इतकेच नाही, तर कोणीतरी असेही म्हटले होते की तुझा आवाज लहान मुलांचे शोषण करणाऱ्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे वाटत आहे’, असेही शाहरुख म्हणाला. त्याच्या या बोलण्याने अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

शाहरुख आणि आलिया यांचा ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाला सध्या प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. आलियाने साकारलेल्या ‘कायरा’ या भूमिकेसाठीही सध्या तिच्या अभिनय कौशल्याची चर्चा होत आहे. तिकीट खिडक्यांवरही हा चित्रपट चांगलीच कमाई करत आहे. कमी बजेटमध्ये बनलेल्या आलिया भट्ट आणि शाहरुख खानच्या ‘डिअर जिंदगी’ चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत चित्रपटाने २० कोटींची कमाई केली होती. पहिल्या दिवशी ८.७५ कोटी, दुस-या दिवशी ११.२५ कोटी इतकी कमाई करणा-या ‘डिअर जिंदगी’ने तिस-या दिवशी म्हणजेच रविवारी १२.५० कोटींचा गल्ला जमविला आहे. त्यामुळे ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांतच ३२.५० कोटी इतकी कमाई केलीय. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 5:24 pm

Web Title: we could do a reverse nishabd shah rukh khan
Next Stories
1 ‘पद्मावती’मधील ‘घुमर…’ गाण्यासाठी साकारली ‘राजेशाही’ प्रतिकृती!
2 ‘मी बिग बॉस १० मध्ये जाणार नाही’
3 आर.जे विद्याची कहानी..
Just Now!
X