असं म्हणतात की, जगात एकसारखे दिसणारे सात लोक असतात. कलाविश्वात असे बरेच जण आहेत जे हुबेहूब नसले तरी त्यांच्या दिसण्यात फार साम्य आढळतं. असंच काहीसं अभिनेता अमेय वाघ व रितेश देशमुख यांच्यासोबत घडलंय. रितेशची पत्नी जेनेलिया देशमुखलाही या दोघांच्या दिसण्यात बरंच साम्य आढळतं. यासंदर्भातला एक किस्सा अमेयने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

‘कॉलेजमध्ये मला सर्वजण म्हणायचे की मी रितेशसारखा दिसतो. पण मी त्यांना म्हणायचो की नाही, माझं पण अस्तित्व आहे. फास्टर फेणे चित्रपटाचं शूटिंग झाल्यानंतर जेनेलियाला शूटिंगचं काम दाखवत होतो. कारण मुलाबाळांमुळे तिला सतत सेटवर येणं जमत नव्हतं. त्यावेळी एका दृश्यावर पॉझ करायला सांगत ती म्हणाली, रितेश या सीनमध्ये अमेय हुबेहूब तुझ्यासारखा दिसतोय. फास्टर फेणेच्या निमित्ताने रितेशला जवळून ओळखण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे सगळ्यात बाबतीत एका चांगल्या माणसाशी माझी तुलना होत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे,’ असं अमेय म्हणाला.

आणखी वाचा : ‘सेक्रेड गेम्स २’च्या कथेबद्दल सैफ अली खानने हा खुलासा

मी कोणासारखा तरी दिसतो ही खरंतर सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे माझं अभिनयात काही पुढे झालं नाही तर डमी म्हणूनही मला घेता येईल अशी गंमतही त्याने केली.

अमेयचा ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये सई ताम्हणकर त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे.