तब्बल २२ वर्षांनंतर ‘चंद्रकांता’ ही मालिका आता पुन्हा नव्या रुपात सुरु होणार आहे. दूरदर्शनवर ‘चंद्रकांता’ मालिका १९९४ साली सुरु झाली होती. तब्बल तीन वर्ष दाखविण्यात आलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन सुनिल अग्निहोत्रीने केले होते. तर निरजा गुलेरी हिने मालिकेची निर्मिती केली होती. याच मालिकेला आता एका नव्या स्वरुपात दाखवण्यात येणार आहे अशा चर्चा सध्या सुरु आहेत. विशेष म्हणजे दोन मोठ्या वाहिन्या ही मालिका पुन्हा आणत आहेत. कलर्स आणि लाइफ ओके या दोन्ही वाहिन्यांवर ‘चंद्रकांता’ मालिका सुरु होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच लाइफ ओके वाहिनीवरील ‘चंद्रकांता’ मालिकेत अभिनेत्री कृतिका कामरा हिची वर्णी लागल्याचे वृत्त आले होते. त्याचवेळी, टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिदेखील तिच्या ‘चंद्रकांता’ मालिकेकरिता मुख्य अभिनेत्रीचा शोध घेत होती. तिचा हा शोध बहुधा आता संपला आहे. कलर्स वाहिनीवर सुरु होणा-या ‘चंद्रकांता’ मालिकेकरिता अभिनेत्री निया शर्मा हिच्याशी चर्चा सुरु आहे. याविषयी इंडियन एक्स्प्रेस संकेतस्थळाने नियाशी संवाद साधला असता तिने या वृत्तास फेटाळले तर नाही पण जोपर्यंत सर्व काही ठरत नाही तोपर्यंत काहीही बोलण्यास नकार दिला. निया म्हणाली की, कलाकार मंडळी कामाकरिता लूक टेस्ट देतच असतात. मग त्याचा इतका गाजावाजा का केला जातो. या गोष्टीवर इतकं लक्ष केंद्रीत करण्याची गरज मला वाटत नसल्यामुळे मी याचे उत्तर देणं गरजेचं समजत नाही. याविषयी निर्णय घेण्यात आल्यानंतर मी स्वतः आनंदाने प्रसारमाध्यमांना ती बातमी देईन. नियाने स्टार प्लस वाहिनीवरील ‘एक हजारो में मेरी बहना है’ या मालिकेने तिच्या करियरला सुरुवात केली होती. नुकतेच तिला आशियातील सुंदर महिलांच्या यादीत तिसरे स्थान मिळाले. नियाने कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि सोनम कपूर यांसारख्या बॉलीवूड सुंदरींना मागे टाकत हे स्थान पटकाविले होते.

लाइफ ओके वाहिनीवरील मालिकेचे ‘प्रेम या पहेली- चंद्रकाता’ असे शीर्षक ठरविण्यात आले असून, एकताच्या मालिकेचे अद्याप नाव ठरलेले नाही. दरम्यान, लाइफ ओकेने मालिकेच्या निर्मितीचे काम सुरु केले आहे. लवकरच बालाजी टेलिफिल्म्सही त्यांच्या मालिकेविषयी माहिती देईल. दरम्यान, लाइफ ओके आणि कलर्स या दोन्ही वाहिन्यांमध्ये वेगळ्याच स्तरावर युद्धाला सुरुवात झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृणाल जैन, राजबीर सिंह आणि ध्रुव भंडारी यांनीही एकताच्या मालिकेकरिता लूक टेस्ट दिली आहे.