15 December 2018

News Flash

रजनीकांत यांच्यावर टीका करायला लाजणार नाही – कमल हसन

ही टीका वैयक्तिक नसून, रजनीकांत यांच्या राजकीय पक्षाच्या योजना आणि तत्वांवर असेल

कमल हसन

अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर राजकीय पक्ष स्थापन करत नव्या कारकिर्दीला सुरुवात करणा-या कमल हसन यांनी वेळ आली तर आपण रजनीकांत यांच्यावर टीका करायला लाजणार नाही असं म्हटलं आहे. कमल हसन सध्या अनेक जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. यावेळी एका तामिळ वृत्तवाहिनीकडून आयोजित प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कमल हसन यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. रजनीकांत यांच्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, ‘वेळ आली तर आपला सहकारी अभिनेता रजनीकांतवर टीका करायला आपण लाजणार नाही. मात्र ही टीका वैयक्तिक नसून, रजनीकांत यांच्या राजकीय पक्षाच्या योजना आणि तत्वांवर असेल’. कमल हसन यांनी ‘मक्कल निधी मय्यम’ पक्षाची स्थापना करत राजकारणात प्रवेश केला आहे. रजनीकांतदेखील येणा-या दिवसांत आपल्या पक्षाची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत.

‘रजनीकांत यांना पक्षस्थापना करु दे, नाव ठरवू दे. माझ्या पक्षाचं एकच लक्ष्य असणार आहे ते म्हणजे समाजकल्याण. आणि हे मी आधीच स्पष्ट केलं आहे. रजनीकांत यांनाही त्यांच्या पक्षाच्या योजना जाहीर करु देत, त्यानंतर काही साम्य आहे का पाहता येईल’, असं उत्तर कमल हसन यांनी रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल विचारलं असता दिलं.

‘जरी काही मतभेद असले तरी मी फक्त त्यांच्या राजकीय गोष्टींवर टीका करेन, वैयक्तिक नाही. ही आमची राजकीय प्रतिष्ठा आहे’, असंही कमल हसन यांनी म्हटलं आहे. कमल हसन यांनी पक्षाची स्थापन करण्याआधी स्वत: जाऊन अनेक राजकीय नेत्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रजनीकांत यांचीही भेट घेतली होती. ‘जर एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असेल, तर ती तीव्रपणे केला जाईल’, असं सांगायला कमल हसन विसरले नाहीत.

पुढे बोलतान कमल हसन यांनी सांगितलं की, ‘आम्ही सत्तेत आल्यास रोजगार निर्माण करणे आणि सर्वांना उत्तम शिक्षण मिळावे हे दोन प्रमुख उद्दिष्ट असतील. चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी याआधीच्या राज्य सरकारने घेतलेल्या चांगल्या कामांची मदत घेतली जाईल’. कमल हसन यांनी यावेळी ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.

आपण अण्णाद्रुमूकच्या विरोधात नाही, पण आपण केलेली प्रत्येक टीका त्यांच्याविरोधात असल्याचाच दावा टीकाकार करत असतात असं कमल हसन यांनी सांगितलं आहे. ‘अण्णाद्रुमूक आमच्याप्रमाणेच एक राजकीय पक्ष आहे. त्यांच्याबद्दल एखादी गोष्ट न आवडण्याचा प्रश्न नाही’, असं ते बोलले आहेत.

‘लोकांच्या भल्यासाठी काम करणारी प्रत्येक व्यक्ती माझा मित्र आहे आणि सत्तेत येऊन पैसा कमावण्याची स्वप्नं पाहणारा प्रत्येकजण माझा शत्रू आहे. अशा लोकांना कोणतंही नाव किंवा पक्ष नको असतो’, असं कमल हसन यांनी सांगितलं आहे. राजकारण लोकांना विभागत असल्याच्या प्रश्नावर बोलत असताना त्यांनी हे उत्तर दिलं.

First Published on March 13, 2018 2:23 pm

Web Title: will not shy away to criticise rajinikanth says kamal haasan