बॉलिवूडमध्ये स्टार होण्याची उर्मी बाळगणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष हा ओघाने आलाच. मात्र, हा संघर्ष करूनही प्रत्येकजण यशस्वी होईलच असे नाही. बॉलिवूडमध्ये योग्यवेळी ब्रेक मिळणे किंवा इंडस्ट्रीतील कुणा गॉडफादरचा हात तुमच्या डोक्यावर असणे या गोष्टी नवोदित अभिनेत्यांच्या दृष्टीने फार महत्वाच्या ठरतात. तर दुसरीकडे, इंडस्ट्रीतील प्रस्थापित नट, निर्माता-दिग्दर्शकांच्या मुला-मुलींना विनासायास चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. बॉलिवूडमधील याच घराणेशाहीवर भाष्य करणारे गाणे ‘हॅश फेम म्युझिक’ने तयार केले असून, या गाण्याच्या माध्यमातून आजच्या घडीला बॉलिवूडमध्ये वडिलोपार्जित पुण्याईच्या जोरावर पुढे आलेल्या नट-नट्यांना चांगलाच चिमटा काढण्यात आला आहे. मात्र, सरतेशेवटी चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी तुमच्यातील गुणवत्ता महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्ही माझ्या वडिलांना ओळखत नसाल, तरी एकदिवस मला मात्र नक्री ओळखाल असा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मिडीयावर शुक्रवारी या गाण्याची लिंक शेअर केल्यानंतर या व्हिडिओची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.