‘लाव रे तो व्हिडिओ’ हा नवा कार्यक्रम लवकरच झी वाहिनीवर सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रमो नुकताच झी युवा वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. अनेकजण घरात बसून कंटाळले आहेत. त्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे.

‘लाव रे तो व्हिडिओ’ या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर बहारदार मिशा असलेला एक माणूस दिसतोय. माईकसमोर बसून, तो ‘व्हिडिओ पाठवा’, ‘व्हिडिओ पाठवा’ एवढंच बोलतोय. हा मिशीवाला बाबा नक्की आहे तरी कोण, याविषयीची उत्सुकता सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. तो सतत मागत असलेला व्हिडिओ नेमका कोणता, आणि तो कुणी पाठवायचा, याची चर्चा सुद्धा आता सुरू झाली आहे. ‘व्हिडिओ पाठवा’ सांगणारा हा मिशीवाला बाबा कोण आहे, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या अप्रतिम कार्यक्रमाचा सूत्रसंचालक, डॉ. निलेश साबळे या शोमध्ये दिसत आहे. याशिवाय प्रोमोमध्ये दिसत असलेले ‘पात्र’ पाहून, हा कार्यक्रम हसून हसून लोटपोट करणार, याची खात्री होताना दिसते आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला सगळ्यांनाच मिळू शकत असल्याने अनेकजण उत्सुक आहेत.