लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचा भाऊ इंद्रजीत सुकुमारनदेखील अभिनेता आहे. या दोन्ही सख्ख्या भावांनी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलंय. इंद्रजीत व पृथ्वीराज या दोघांनाही अभिनयाचा वारसा घरातून मिळाला, कारण त्यांची आई मल्लिका अभिनेत्री व वडील सुकुमारन हे लोकप्रिय अभिनेते होते.
सुकुमारन हे ८० च्या दशकात मल्याळम सिनेमाच्या सुपरस्टार त्रिकुटापैकी एक होते. त्या त्रिकुटातील इतर दोघे म्हणजे मामूट्टी व मोहनलाल होय. १९९७ मध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने सुकुमारन यांचे ४९ व्या वर्षी निधन झाले. नंतर आईने कुटुंबासमोर आलेल्या सर्व संकटांचा हिमतीने सामना केला, असं इंद्रजीत व पृथ्वीराज यांनी अनेकदा सांगितलंय.
पृथ्वीराजने एका मुलाखतीत त्याच्या आईचं कौतुक केलं. “मला वाटतं माझ्या आईचा प्रवास खूप उल्लेखनीय आहे. खरं तर सगळ्या मुलांना आपल्या आईचं कौतुक असणं स्वाभाविक आहे. पण माझ्या आईला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तिचं पहिलं लग्न अपयशी ठरलं, त्यातून बाहेर पडताना अडचणींचा सामना करावा लागला. तिला तिची बाजू कुटुंबासमोर मांडण्यातही अडचणी आल्या,” असं पृथ्वीराज म्हणाला. मल्लिका यांचं पहिलं लग्न जगथी श्रीकुमार यांच्याशी झालं होतं, तीन वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता.
आई-वडिलांच्या प्रेमाबद्दल पृथ्वीराज म्हणाला….
“त्या काळात एखाद्या परीकथेप्रमाणे, मल्याळम सिनेमातील सर्वात मोठे स्टार (सुकुमारन) अम्माच्या प्रेमात पडले. एका रात्री अचानक ते माझ्या आईच्या घरी गेले आणि तिच्या आई-वडिलांना म्हणाले, ‘तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून द्याल का?’ त्यांनी होकार दिला आणि नंतर आईने दुसरं लग्न केलं. दोघांनी २३ वर्षे सुखाचा संसार केला,” असं पृथ्वीराज म्हणाला.
अचानक वडिलांचं निधन झालं – पृथ्वीराज
“सगळं सुरळीत चाललं होतं आणि माझ्या वडिलांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने आमचं संपूर्ण आयुष्य बदललं. ते इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील, अशी कल्पनाही आम्ही केली नव्हती. रोज ते असायचे, पण आता ते नव्हते. त्यावेळी मी एका रात्रीत बदललेली अशी स्त्री पाहिली, जिने आयुष्याची २३ वर्षे एक आई आणि पत्नी म्हणून घालवली होती, तिने अचानक कुटुंबाची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. वडिलांचं निधन झालं तेव्हा मी दहावीत होतो आणि माझा भाऊ इंजिनिअरींग कॉलेजला प्रवेश घेणार होता. माझी आई त्यावेळी खचली असती तर कदाचित मी आणि माझा भाऊ आज जिथे आहोत तिथे नसतो,” असं पृथ्वीराज सुकुमारन आईबद्दल म्हणाला.