बॉलीवूडचा बादशहा आणि रोमान्स किंग शाहरुख खानचे चाहते जगभरात आहेत. नुकताच, पाकिस्तानमधील त्या निळे डोळे असणा-या चहावाल्याने आपण शाहरुखसारखे दिसत असल्याचे म्हटले होते. त्याच्या अभिनयाने आणि वेगळ्या अशा अंदाजाने लोकांवर अशी काही भुरळ पाडली आहे की चाहत्यांच्या मनात त्याची खास जागा तयार झाली आहे. चाहत्यांसोबतही काहीवेळा विचित्र किस्से होत असतात. त्यावेळी त्या गोष्टी विचित्र वाटतात. पण, नंतर जाऊन ती गोष्ट असंही कधीतरी झालं होतं म्हणून आठवल्यावर हसू येतं. असाच एक किस्सा शाहरुखने ‘यादो की बारात’ या शोमध्ये सांगितला.

या गोष्टीला जवळपास २० वर्ष लोटली असतील. पण, ही गोष्ट शाहरुखच्या अशी काही लक्षात राहिली की जणू हे काल परवाच घडलं असेल. याविषयी शाहरुख म्हणाला की, मी लंडनच्या हीथ्रो विमानतळावर होतो. तेव्हा एक महिला खूप लांबून धावत माझ्याकडे ऑटोग्राफ मागण्यासाठी आली. आता तुम्ही म्हणाल की, शाहरुखचे एवढे करोडो चाहते आहेत. त्यात त्याच्याकडे कोणी ऑटोग्राफ घेण्यासाठी धावत आलं तर त्यात नवल काय? तर खरा किस्सा पुढे आहे. त्या महिलेने शाहरुखला अक्षय कुमार समजून ऑटोग्राफ मागितली होती. जेव्हा शाहरुखला कळलं की आपल्याला ती महिला अक्षय समजतेय तेव्हा त्याला अजिबात राग आला नाही. उलट तो म्हणाला की, तुम्हाला माझे ते ‘तू चीज बड़ी है मस्त-मस्त’ गाणे नक्कीच आवडले असेल. त्यावर महिलेनेही होय असे उत्तर दिले. त्यानंतर शाहरुखने हसत तिला ऑटोग्राफ दिली. त्यावर त्याने लिहले होते, ‘विथ लव्ह फ्रॉम अक्षय कुमार’. शाहरुखने ती वेळ सांभाळून घेतल्याने त्या महिलेचेही मन मोडले नाही.