आईला तिचे जुने घर भेट देणार

बॉलीवूडमधील पन्नाशी पार केलेल्या ‘खान त्रिमूर्ती’मध्ये सर्वात मोठे असण्याचा मान आमिर खानकडे जातो.

वाढदिवसानिमित्त आमिर खानची इच्छा
बॉलीवूडमधील पन्नाशी पार केलेल्या ‘खान त्रिमूर्ती’मध्ये सर्वात मोठे असण्याचा मान आमिर खानकडे जातो. योगायोगाने आमिर, सलमान आणि शाहरूख खान यांचा जन्म १९६५ सालचा आहे. त्यातही दरवर्षी पहिला वाढदिवस १४ मार्चला आमिरचा असतो. आमिर खानने वयाचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतरचा त्याचा हा ५१ वा वाढदिवस आहे. यंदा वाढदिवस लॉस एंजेलिसमध्ये मुलगा जुनैद याच्याबरोबर साजरा करण्याचा आमिरचा मानस होता. मात्र त्याने हा खास वाढदिवस आपल्याबरोबर साजरा करावा, अशी इच्छा त्याच्या आईने व्यक्त केल्यामुळे सोमवारी सकाळी आमिरने मुंबई गाठले. आपल्या वाढदिवसानिमित्त आईला तिचे वाराणसीतील जुने घर विकत घेऊन भेट देण्याची इच्छा आमिरने जाहीर केली.‘माझी अम्मी ऐंशी वर्षांची आहे. तिच्या लहानपणीच्या आठवणी जिथे जतन केल्या आहेत ते घर मी तिला देऊ शकलो तर खूप आनंद होईल’, असे आमिरने वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. वाराणसीतील आईच्या घरात जे कुटुंब राहते आहे त्यांना विनंती करून ते घर पुन्हा विकत घेण्याचा आपला मनसुबा असल्याचे आमिरने सांगितले. गेल्या काही महिन्यांत आमिरवर सर्वच स्तरांतून टीका झाली, मात्र याविषयी अशा गोष्टी नेहमीच्याच आहेत, असे म्हणत आपण या वादातून बाहेर पडलो असल्याचे त्याने दाखवून दिले. दरवर्षी काही ना काही नवे शिकण्याचा आपला संकल्प असतो. या वेळी मात्र त्याचे लक्ष आपल्या अम्मीची इच्छा पूर्ण करण्याकडे लागले असल्याचे त्याने सांगितले. आमिर खान सध्या ‘दंगल’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे जालंधर येथील चित्रीकरणाचे एक सत्र पूर्ण झाले आहे. आत्तापर्यंत या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिरने ९५ किलोपर्यंत वजन वाढवले होते. मात्र चित्रीकरणाच्या दुसऱ्या सत्रात त्याला पहेलवान फोगट यांच्या तरुणपणातील भूमिका साकारायची असल्याने हे वाढवलेले वजन ३० ते ४० किलोने कमी करावे लागणार आहे. वाढदिवसासाठी आपला मुलगा आझाद याने काढलेल्या चित्राची प्रिंट असलेला टी शर्ट आपण परिधान केला असल्याचे सांगत सध्या त्याने १३ किलो वजन कमी केले असल्याची माहिती दिली.

आमिरच्या वाढदिवसाला ‘बागी’चे ट्रेलर लाँच
आमिर खानचे चाहते खुद्द इंडस्ट्रीतही आहेत. मात्र गेल्या वर्षी खास आमिरच्या उपस्थितीत ‘हिरोपंती’ची सुरुवात करणारा अभिनेता टायगर श्रॉफ त्याचा निस्सीम चाहता आहे. याही वर्षी आमिरच्या वाढदिवसाचे निमित्त साधून टायगरने साजिद नाडियादवाला निर्मित ‘बागी’ या चित्रपटाचे ट्रेलर लाँच के ले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aamir khan plans to buy home for his mother in varanasi