बॉलिवूड अभिनेता आमिर खान ‘दंगल’ सिनेमानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला सज्ज झाला आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या दंगल सिनेमात त्याने एका कडक शिस्तीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तर ‘सिक्रेट सुपरस्टार’मध्ये तो पूर्णतः वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमात तो एका संगीत दिग्दर्शकाची भूमिका साकारत आहे. आमिरने सोमवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘सेक्सी बलिए’ डान्सचा मेकिंग व्हिडिओ शेअर केला. मिका सिंगने हे गाणे गायले असून अमित त्रिवेदीने ते संगीतबद्ध केले आहे. आमिरचा हा मेकिंग व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिनेमातील हे गाणे फार मजेशीर असून सर्वात जास्त मजा ही आमिरला नाचताना पाहताना येते. ‘दंगल’मध्ये आमिरच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या सान्या मल्होत्राने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. नृत्य दिग्दर्शक म्हणून तिने हे पहिलेच गाणे कोरिओग्राफ केलेय. आपल्या पहिल्या गाण्यासाठी तिने आमिरसोबत काम करायची संधी मिळाल्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या सिनेमात सान्याची काहीच भूमिका नसली तरी या मार्गाने का होईना ती ‘सिक्रेट सुपरस्टार’ टीमशी जोडली गेली आहे.

अद्वैत चंदन दिग्दर्शित या सिनेमात ‘दंगल गर्ल’ झायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. झायराला गायिका व्हायचे असते पण तिच्या स्वप्नांच्या मार्गात सर्वांत मोठा अडथळा असतो तो म्हणजे तिचे वडील. तरीही न खचता ती बुरखा घालत आणि स्वत:ची ओळख लपवून आपल्या गाण्याचे व्हिडिओ ती यूट्युबवर शेअर करत असते. या व्हिडिओमुळे ती एका रात्रीत स्टार होते. संपूर्ण जगाला आपल्या आवाजाची ओळख व्हावी अशी झायराची इच्छा असते. तिच्या या स्वप्नात तिची आई तिला मदत करताना दिसते. १९ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan shared his new movie secret superstar song sexy baliye making video
First published on: 17-10-2017 at 11:12 IST