abdu rozik breaks silence on being detained in dubai : अलीकडेच ‘बिग बॉस १६’फेम अब्दू रोजिकबद्दल बातमी आली होती की, त्याला चोरीच्या आरोपाखाली दुबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्या टीमने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत सांगितले की, अब्दूला नुकतेच ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यानंतर अब्दूनेही या वृत्तांवर आपले मौन सोडले. अब्दू म्हणाला होता, “मी ठीक आहे. सर्व काही ठीक आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.” आता पुन्हा एकदा अब्दू या प्रकरणावर उघडपणे बोलला आणि सांगितले की, हे सर्व त्याच्या एक्स-मॅनेजमेंट टीमने केले आहे.
त्यांनी अब्दूची प्रतिमा खराब करण्यासाठी खोटी बातमी पसरवली होती. अब्दूने सांगितले की, ज्या गोष्टींचा चोरीचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता त्या त्याच्या स्वतःच्या होत्या.
अब्दू ‘बॉलीवूड बबल’शी बोलत होता. त्याने त्याच्या चाहत्यांना संदेश दिला की, सर्व काही ठीक आहे. अब्दूने सांगितले की, ही कहाणी त्याच्या एक्स-मॅनेजमेंट टीम IFCM ने तयार केली होती, ज्यांनी त्याच्यावर खोटे दावे केले आणि त्याच्या स्वतःच्या वस्तू चोरल्याचा आरोप केला. त्यामध्ये त्याच्या वाढदिवसाला मिळालेली गुच्ची बॅग, त्याने स्वतःसाठी विकत घेतलेला मोबाईल फोन, एका मित्राने त्याला दिलेले रोलेक्स घड्याळ यांचा समावेश होता.
अब्दू म्हणाला, “माझा एक्स-मॅनेजर या गोष्टी चोरीच्या म्हणत आहे हे हास्यास्पद व चुकीचे आहे. सत्याच्या बाजूने उभ्या राहिलेल्या सर्व लोकांचे मी आभार मानू इच्छितो. हे माझ्यासाठी आणखी एक आव्हान आहे आणि मला अधिक मजबूत व प्रेरित करत आहे.”
टीमने एक निवेदन जारी केले होते
खलीज टाइम्सच्या वृत्तात, अब्दूच्या टीमने एक विधान दिले होते, “सर्वांत पहिली बाब म्हणजे त्याला अटक करण्यात आलेली नाही, त्याला पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. अब्दूने सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत आणि त्याला सोडण्यात आले आहे. आज तो दुबईमध्ये होणाऱ्या पुरस्कार कार्यक्रमात सहभागी होईल. दुसरे बाब म्हणजे माध्यमांमधील माहिती चुकीची आहे. अब्दूची प्रतिमा वाचवण्यासाठी आम्ही कायदेशीर कारवाई करू. या मुद्द्यावर आम्हाला बरेच काही सांगायचे आहे. आम्ही नंतर भारतातील लोकांना सर्व माहिती देऊ.”
अब्दू रोजिक हा दुबईचा रहिवासी आहे. सलमान खानच्या ‘बिग बॉस १६’ शोमधून त्याला भारतात ओळख मिळाली. या शोमध्ये प्रेक्षकांनी अब्दूवर खूप प्रेम केले. त्यानंतर तो एका म्युझिक व्हिडीओमध्येही दिसला होता. तो शेवटचा भारतात ‘लाफ्टर शेफ्स’ या टीव्ही शोमध्ये दिसला होता.