चित्रपटसृष्टीत ग्लॅमर नाही, अनेकजण संघर्ष करून, धडपड करून काम मिळवतात. काहींना यश मिळतं, तर काहींना अपयश येतं आणि ते कायमचे इंडस्ट्रीपासून दूर जातात. पण काही जण असेही असतात, ज्यांना काही वर्षे काम मिळतं आणि मग संधी कमी होत जातात आणि जगावं तरी कसं? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकतो.
आज अशाच एका अभिनेत्याची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. त्याच्या वडिलांनी दाक्षिणात्य इंडस्ट्रीत दिग्गजांबरोबर काम केलं होतं. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तोही सिनेविश्वात आला. त्याच्या मोजक्याच भूमिका आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. पण आता मात्र त्याची परिस्थिती इतकी बिकट आहे की तो सरकारी मेसमधील जेवणावर अवलंबून आहे. तसेच त्याला विविध आजारांनी ग्रासलं आहे.
वैद्यकीय बिलं भरायला नाहीत पैसे
या अभिनेत्याचं नाव अभिनय किंगर असं आहे. ४४ वर्षांचा अभिनय यकृताच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. तसेच तो सध्या आर्थिकदृष्ट्याही संघर्ष करत आहे. अभिनयच्या हाताला काम नाही आणि त्याची काळजी घ्यायला कोणी नाही. त्यामुळे त्याला त्याची वैद्यकीय बिलं भरायला आणि उदरनिर्वाह करायला अडचण येतेय. गेल्या वर्षी एका मुलाखतीत, अभिनयने सांगितलं की तो सरकारी मेसमधून मिळणाऱ्या जेवणावर अवलंबून असतो.
वडिलांच्या निधनानंतर परिस्थिती बिकट
अभिनय हा दिवंगत प्रसिद्ध अभिनेते टीपी राधामणी यांचा मुलगा आहे, ज्यांनी तमिळ आणि मल्याळम चित्रपट उद्योगातील अनेक महत्त्वाच्या कलाकारांबरोबर काम केलंय. २०१९ मध्ये कर्करोगाने त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर अभिनयची प्रकृती आणखी बिकट झाली.
अभिनयने २००२ मध्ये धनुषबरोबर ‘थुल्लूवधो इलामाई’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. धनुषचे वडील कस्तुरी राजा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनयने सर्वांते लक्ष वेधून घेतले. यानंतर त्याला जंक्शन नावाचा चित्रपट मिळाला. यात त्याने मुख्य भूमिका केली होती. त्याच वर्षी त्याने दिग्गज दिग्दर्शक फाझिल यांच्या काई एथुम धुराथूमध्ये छोट्या भूमिकेसह मल्याळम चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. हा फहाद फासिलचा पदार्पणाचा चित्रपट होता.
अभिनय नंतर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं. यात ‘दास’, ‘पोन मेगालाई’, ‘थोडाक्कम’, ‘सोल्ला सोल्ला इनिक्कम’, ‘पलायवाना सोलाई’, ‘अरुमुगम’, ‘कथा’, ‘आरोहणम’ आणि ‘एंड्रेंद्रम पुन्नगाई’ या तमिळ चित्रपटांचा समावेश आहे. तो शेवटचा दिग्दर्शक श्रीनाथच्या ॲक्शन कॉमेडी ‘वल्लवानुक्कु पुलुम आयुधम’ (२०१४) या चित्रपटात दिसला होता. अभिनयने पूर्वी डबिंग कलाकार म्हणूनही काम केले आहे. त्याने ‘थुप्पाक्की’ आणि ‘अंजान’ मध्ये विद्युत जामवाल, ‘पैया’ मधील मिलिंद सोमण आणि ‘काका मुट्टई’ मध्ये बाबू अँटोनी यांच्या पात्रांना आवाज दिला आहे.