उरी हल्ल्यानंतर देशात जे ताणतणावाचे वातावरण आहे त्याबद्दल अक्षय कुमारनेही आता त्याचे मत मांडले आहे. अक्षयने ट्विटरच्या सहाय्याने त्याचे हे मत मांडले. यात त्याने देशवासियांसाठी एक संदेश दिला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले की, ‘गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट माझ्या डोक्यात सतत येत आहे. जी मला आता बोलावीच लागेल. यात मी कोणालाही दुखावू इच्छित नाही.’ १ मिनिट १९ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये देशवासियांना भांडणं सोडून जे जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांबाबत विचार करायला हवा असा संदेश त्याने यात दिला आहे.

अक्षय म्हणतो की, ‘आज मी तुमच्यासोबत एक कलाकार म्हणून नाही तर एका सैनिकाचा मुलगा या नात्याने बोलणार आहे. खूप दिवसांपासून मी बातम्यांमध्ये आपलीच माणसं आपल्या माणसांशी भांडताना पाहत आहे. कोणी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत आहेत. तर कोणी कलाकारांवरच्या बंदीवर भांडत आहे. काहींना युद्ध होणार का याबद्दल चिंता वाटते आहे. याबद्दल आपल्याला लाज वाटली पाहीजे. या सगळ्यावर नंतरही भांडता येऊ शकते. पण सीमेवर कोणाचा तरी जीव गेला आहे याकडे आधी लक्षं द्या. १९ जवान उरी हल्ल्यात शहिद झाले आहेत. यात २४ वर्षीय जवान नितिन यादव हा बारामुल्लामध्ये शहीद झाला. त्या जवानांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना या गोष्टीची चिंता आहे का की कोणता सिनेमा प्रदर्शित होणार की नाही, कलाकारावर बंदी लागू होणार की नाही. नाही, त्यांना फक्त एकाच गोष्टीची चिंता आहे ती म्हणजे त्यांचे भविष्य. त्यांचा वर्तमान आणि भविष्य चांगला असला पाहिजे याची आपण चिंता करायला हवी. ते आहेत म्हणून आज मी आहे. ते आहेत म्हणून आज तुम्ही आहात. ते नाहीत तर भारत नाही. जय हिंद.’

याआधी उरी हल्ल्यानंतर देशात अनेक वादांना तोंड फुटले होते. काही लोक भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध करावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. तर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्याच्या मुद्यावरुनही बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत.