टेलिव्हिजनवरील अभिनेता आणि होस्ट मनिष पॉलने त्याच्या दमदार सूत्रसंचालनाने आजवर प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. अनेक पुरस्कार सोहळ्यात मनिष त्याच्या विनोदाने आणि हटके स्टाइलने रंगत आणतो. एखादा शो असो किंवा पुरस्कार सोहळा मनिष अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतो. आत्ताच्या घडीला मनिषला सिनेसृष्टीत ओळख मिळाली असली. तरी इथवर पोहचण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला आहे.
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’च्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये मनिषने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे. यावेळी मनिषने त्याच्या संघर्षाच्या काळात पत्नी संयुक्ताने कश्याप्रकारे त्याला साथ दिली हे सांगत तिचं कौतुक केलंय. या पोस्टमध्ये तो म्हणालाय, ” संयुक्ताबद्दल माझी पहिली आठवण मी तिसरीत असतानाची आहे. एका फॅन्सी ड्रेस स्पर्धेत ती मदर टेरेसा बनली होती आणि मी राज कपूर. आम्ही बालवाडीपासून एकमेकांना ओळखतो. मात्र तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलायचो नाही. ती आभ्यासात खूप हुशार होती आणि मला मात्र आभ्यासाचा कंटाळा यायचा.” असं तो म्हणाला.
या पोस्टमध्ये करिअरच्या सुरुवातीला त्याला संयुक्ताने कशी साथ दिली याबद्दल त्याने सांगितलं आहे. तो म्हणाला, “२००६ सालात मला पहिल्यांजा फुलटाइम आरजेचा जॉब मिळाला होता. त्यानंतर मी संयुक्ताला म्हणालो चल लग्न करुया. मोठ्या थाटामाटात पंजाबी आणि बंगाली पद्धतीने आमचं लग्न झालं. लग्नानंतर संयुक्ताने देखील शिक्षिकेची नोकरी सुरू केली. मी नोकरी करत होतो आणि सोबतच काही सुत्रसंचालनाच्या संधी मिळतील तिथे सुत्रसंचालन करत होतो. आम्ही आपापल्या कामात व्यस्त होतो. मात्र तिने कधीही कोणत्याही गोष्टीसाठी तक्रार केली नाही. मला नक्कीच चांगली संधी मिळेल असा धीर तिने कायम दिला.” असं मनिष या पोस्टमध्ये म्हणालाय.
View this post on Instagram
तेव्हा संयुक्ताने सर्व काही सांभाळलं.
तसचं तो म्हणाला, “जेव्हा एक वर्ष माझ्याकडे काम नव्हतं घराचं भाडं भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. तेव्हा संयुक्ताने सर्व काही सांभाळलं. शिवाय तिने कायम मला धीर आणि प्रोत्साहन दिलं.” यानंतर वर्षभरातच मनिषला एका मालिकेत काम मिळाल्याचं त्यानं सांगितलं आहे. त्यानंतर मनिषला करिअरमध्ये चांगल्या संधी येऊ लागल्या.
२०११ मध्ये मनिष आणि संयुक्ताला मुलगी झाली तर २०१६ मध्ये मुलगा झाला. आता कुटुंबासाठी मला खूप वेळ देता येतो असं तो म्हणालाय. शिवाय जेवणाच्या टेबलवर कधीच कामाची चर्चा करायची नाही असा एक नियम ठरवल्याच त्याने सांगितलं.