कन्नड अभिनेता दर्शन चाहत्याच्या खून प्रकरणात तुरुंगात आहे. जून २०२४ मध्ये चित्रदुर्ग येथील रहिवासी रेणुकास्वामीचे अपहरण आणि हत्या केल्याप्रकरणी दर्शनला अटक करण्यात आली होती. मृत रेणुकास्वामी अभिनेता दर्शन थुगुदीपाचा चाहता होता. सध्या तुरुंगात असलेला दर्शन न्यायालयात न्यायाधीशांसमोर रडल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्यांनी दर्शनला परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातून बल्लारी कारागृहात हलविण्यात यावे, यासाठी न्यायालयात अपील केले होते. हे जे फेटाळण्यात आले आहे. पण आता दर्शनला तुरुंगात काही सवलती देण्यात आल्या आहेत. दर्शनला आता तुरुंगाच्या परिसरात फिरण्याची परवानगी असेल. चादर, उशी आणि अतिरिक्त बेड यासारख्या काही सुविधा देण्याची विनंतीही न्यायालयाने मान्य केली आहे, परंतु या सर्व गोष्टी तुरुंगाच्या नियमांनुसार असाव्यात असे स्पष्ट आदेश दिले आहेत. दर्शनने जर कोणताही नियम मोडला, तर कारागृह महानिरीक्षकांना शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार, दर्शनला इतर तुरुंगातही पाठवलं जाऊ शकते, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.
न्यायाधीशांसमोर रडला दर्शन
सुनावणीदरम्यान दर्शन रडला. तो न्यायाधीशांना म्हणाला की त्याने ३० दिवसांपासून सूर्यप्रकाश पाहिलेला नाही आणि त्याच्या हाताला संसर्ग झाला आहे. “मला विष द्या,” असंही दर्शन न्यायाधीशांना म्हणाला. या वक्तव्यानंतर न्यायाधीशांनी त्याला फटकारलं.
मृत रेणुकास्वामी हा दर्शनचा चाहता होता. त्याने अभिनेत्री पवित्रा गौडा हिला सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते. याचा राग मनात धरून असलेल्या दर्शनने काही लोकांच्या मदतीने खून केला. आधी रेणुकास्वामीला बंगळुरूला आणलं, त्याला मारहाण केली आणि नंतर त्याचा मृतदेह एका नाल्याजवळ फेकून दिला होता.
कामाक्षीपल्य पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पट्टणगेरे भागातील एका शेडमध्ये रेणुकास्वामीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जवळच्या नाल्यात फेकण्यात आला होता. रेणुकास्वामीला मारहाण झाली व त्याचा खून झाला तेव्हा दर्शन व पवित्रा दोघेही तिथे उपस्थित होते, असं पोलिसांनी म्हटलं होतं.