अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात चौकशाठी हजर झाली आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीने जॅकलीनला समन्स बजावले होते. सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी केली जात आहे.

५ डिसेंबर रोजी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मस्कतला जाण्यासाठी निघालेली असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला अडवण्यात आलं होतं. तिच्याविरोधात ईडीने जारी केलेल्या लूक आऊट नोटीसमुळे तिला भारताबाहेर कोठेही न जाण्याची ताकीद देण्यात आली होती.  

दरम्यान, सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारियासह इतर ६ जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून ७००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रातील दाव्यानुसार, २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर कोट्यावधी रुपये खर्च केले होते. त्यावेळी जॅकलिन सुकेशला डेट करत होती, असेही बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. जॅकलिनसोबतच या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचाही उल्लेख केला आहे. सुकेशने नोराला खूप महागडी कार भेट म्हणून दिली होती. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी २०० कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून जॅकलिनची जवळपास ८ तास चौकशी झाली होती. २३ ऑक्टोबर रोजी सुकेश चंद्रशेखरचे वकील यांनी खुलासा केला होता की जॅकलीन तुरुंगात असलेल्या सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण जॅकलिनने हे खोटे असल्याचे म्हटले होते. “जॅकलिन फर्नांडिसला ईडीने साक्षीदार म्हणून बोलावले आहे. तिने तिचे जबाब नोंदवले असून, ती या पुढेदेखील तपासकार्याला पूर्णपणे सहकार्य करेल,” असे जॅकलिनच्या वकिलाने म्हटले होते. २०० कोटींच्या खंडणीप्रकरणात ‘मद्रास कॅफे’ फेम अभिनेत्री लीना मारिया पॉललाही अटक करण्यात आली.