सिनेसृष्टीत लगीनघाई सुरू आहे. बॉलीवूड कलाकार पुलकित सम्राट व क्रिती खरबंदा यांच्या लग्नाआधीच्या विधी सुरू झाल्या आहेत. उद्या १५ मार्च रोजी त्यांचं लग्न आहे. अशातच आता एका दाक्षिणात्य अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरक यांनी साखरपुडा केला आहे. या दोघांनी २०१९ मध्ये ‘राजा वारू राणी गारू’ या तेलुगू चित्रपटामधून पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ते एकमेकांसह डेटिंग करत होते, बुधवारी एका खासगी सोहळ्यात दोघांनी साखरपुडा केला. हैदराबादच्या एका रिसॉर्टमध्ये या जोडप्याचा साखरपुडा पार पडला.
किरण व रहस्याच्या साखरपुडा सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साखरपुड्यात किरणने गुलाबी कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला आहे तर रहस्या ऑलिव्ह-ग्रीन रंगाच्या साडीमध्ये सुंदर दिसत आहे. ते एकमेकांचे हात हातात घेऊन अंगठ्या घालतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत.
जवळपास चार वर्षं आपलं नातं गुपित ठेवल्यानंतर अखेर या जोडप्याने या नात्याला नाव दिलं आहे. किरणने ‘एसई कल्याणमंडपम’, ‘सम्माथमे’, ‘मीटर अँड रुल्स रंजन’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, किरण आणि रहस्या ऑगस्टमध्ये लग्नबंधनात अडकतील.