बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. कुणाल खेमूच्या आजीचे नुकतंच निधन झाले आहे. कुणालने या निमित्तान सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टद्वारे त्याने आजीच्या निधनाची बातमी सांगितली आहे. ही पोस्ट शेअर करताना तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

कुणाल खेमू हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच कुणालने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या आजीसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. त्यात त्याची लेक इनायाही दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने यासोबत एक भावूक पोस्टही लिहिली आहे.

“मी आज माझ्या आजीला गमावले. आम्ही सर्व तिला प्रेमाने माँ जी म्हणून हाक मारायचो. तिने खरोखरच हे नाव कमावले होते. ती खरंच आईसारखी आहे. तिने आम्हा सर्वांवर आईसारखे प्रेम केले. आम्ही जेव्हा जेव्हा तिच्यासोबत असायचो तेव्हा ती आम्हाला आरामदायी आणि आनंदी ठेवण्यासाठी फार मेहनत घ्यायची. माझ्या तिच्यासोबत खूप खास आणि छान आठवणी जोडल्या गेल्या आहेत. ती मला कथा सांगायची. मला खायला घालायची आणि माझी काळजी घ्यायची.

तिने माझ्यासाठी अशा गोष्टी खरेदी केल्या, ज्या माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी कधीही घेतल्या नाहीत. ती मला नेहमी सांगायची की स्वतःवर विश्वास ठेव आणि कधीही कोणाचीही फसवणूक करु नको. ती माझी सर्वात मोठी चेअरलीडर होती. ती माझ्यासाठी शक्ती, करुणा आणि प्रेमाचे प्रतीक होती. तिला मी कधीही रडताना पाहिल्याचे मला आठवत नाही. ती नेहमी काही ना काही कामात व्यस्त असायची. मला नेहमीच तुझी आठवण येईल”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान कुणाल खेमू हा शेवटचा लूटकेस या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे फार कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर आता कुणाल खेमू लवकरच विपुल मेहताच्या ‘कंजूस मक्खीचूस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्वेता त्रिपाठी आणि पियुष मिश्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.