अभिनेता दीपक तिजोरीला सध्या त्याच्या खासगी आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्याच्या बायकोने त्याला घराबाहेर काढल्याचे वृत्त सध्या चर्चेत आहे. दीपक आपल्या पत्नीसोबत गोरेगावला ४ बीएचकेच्या घरात राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांच्या नात्यात मतभेदांमुळे तणावाचे वातावरण होते. ‘स्पॉटबॉय’ या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शिवानीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करुन दीपककडे पोटगीची मागणीही केली आहे. दीपकची आर्थिक परिस्थिती पाहता तो पोटगी देऊ शकेल या परिस्थितीत नाही. म्हणून जेव्हा दीपकने एका मध्यस्तीशी याबाबत चर्चा केली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट त्याच्या समोर आली.
शिवानी, जी दीपककडे घटस्फोटाची आणि त्यानंतरच्या पोटगीची मागणी करत आहे ती कायदेशीर त्याची पत्नीच नाहीये. दीपक हा शिवानीचा दुसरा नवरा आहे. दीपकशी लग्न करताना शिवानीने पहिल्या पतीला घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे त्यांचे लग्न हे बेकायदेशीर आहे. दीपकला त्याच्या घरी आल्यानंतर फक्त एकच खोली दिली जायची. शिवानीने नोकरांना त्याची खोली साफ करण्याची तसेच त्याला जेवण द्यायलाही मनाई केली होती. त्यामुळे दीपक अनेकदा भाड्याने किंवा मित्रांच्याच घरी राहायला जायचा.
बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या चेहऱ्यांपैकी एक चेहरा म्हणजे दीपक तिजोरी. १९८८ मधे आलेल्या ‘तेरा नाम मेरा नाम’ या सिनेमातून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. दीपकचे ‘दिल’, ‘आशिकी’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘खिलाडी’ हे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. मोठ्या पडद्यासोबतच त्याने छोट्या पडद्यावरही त्याने मालिकांची निर्मिती केली होती. तसेच त्याने गुजराती भाषेतही काम केले आहे.
२००५ मध्ये दीपकने दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकले. दीपकने ‘खामोश’, ‘फरेब’, ‘टॉम डिक अॅण्ड हॅरी’, ‘टॉम डिक अॅण्ड हॅरी २’ या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. तसेच २०१६ मध्ये रणदीप हुड्डा आणि काजल अग्रवालचा ‘दो लफ्जों की कहानी’ या सिनेमाचेही त्याने दिग्दर्शन केले होते.