scorecardresearch

Premium

पुन्हा एकदा सिद्धार्थचा धिंगाणा!

आपल्या अभिनयाने एकांकिका-नाटक आणि आता मराठी-हिंदी चित्रपट गाजवणाऱ्या सिद्धार्थने सूत्रसंचालन केलं नव्हतं. ‘

actor siddharth jadhav first show aata hou de dhingaana on star pravah channel
सिद्धार्थ

दूरचित्रवाहिनीवर एखादा शो केवळ आपल्या सूत्रसंचालनाच्या जोरावर प्रसिद्ध करणं ही सोपी गोष्ट नाही. पण कायम सळसळत्या उत्साहाने वावरणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या पहिल्याच कार्यक्रमात सूत्रसंचालनाने बहार उडवून दिली. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये आणि कलाकारांमध्येही पसंतीचा ठरला आहे. कलाकारांचे साधे साधे खेळ घेत त्यातली धम्माल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थने केले होते. आता या कार्यक्रमाचे दुसरे पर्वही प्रेक्षकांसमोर आले आहे.  ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पहिल्याच भागात ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिकांमधील कलाकारांनी सहभाग घेतला. आता पुन्हा त्याच उत्साहात हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या दुसऱ्या पर्वाच्या निमित्ताने बोलताना सिद्धार्थने पहिल्या भागाच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या अभिनयाने एकांकिका-नाटक आणि आता मराठी-हिंदी चित्रपट गाजवणाऱ्या सिद्धार्थने सूत्रसंचालन केलं नव्हतं. ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या निमित्ताने मी पहिल्यांदा सूत्रसंचालन केलं, असं सिद्धार्थने सांगितलं.  ‘हा कार्यक्रम सुरू करताना मनात थोडी भीती होती, पण कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला आणि घराघरात लोकप्रिय झाला. याचं संपूर्ण श्रेय ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आहे, असं त्याने सांगितलं. या कार्यक्रमाचं स्वरूपही लोकांना आवडेल वा मजा येईल असं असल्याचं तो सांगतो. ‘आता होऊ दे धिंगाणा’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा खेळ पाहताना प्रेक्षकही त्यात रंगत जातात. खेळ जिंकण्यासाठी त्यांची धडपड आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गमतीजमती सेटवर जशा आम्ही अनुभवत असतो तसंच प्रेक्षकही त्याचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळेच हा कार्यक्रम रसिकांना अधिक आवडला, असं सिद्धार्थने सांगितलं.

हेही वाचा >>> धक्कादायक! ३१ वर्षीय मॉडेलचा फ्रिजमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, मृत्यूआधी केला भयावह प्रकार

Siddharth Chandekar wanted to become a chef
सिद्धार्थ चांदेकरला अभिनेता नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते करिअर; म्हणाला, “आमच्या घरात…”
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
Mahesh Manjrekar
कधी तरी मरू या भीतीमुळे आजचं जगणं कधीच थांबवू नये – महेश मांजरेकर
karan grover
‘चांगल्या कामाच्या बळावरच चित्रपटसृष्टीत टिकू शकता’

या कार्यक्रमात कलाकारच स्पर्धक म्हणून सहभागी होत असल्याने अनेक दिग्गज कलाकारांचा सहवास लाभला, त्यांच्या आठवणी ऐकता आल्या, त्यांनी केलेला संघर्ष आणि यशापयशाच्या काळात घेतलेली मेहनत समजून घेता आली. तसंच काही खास प्रसंगही अनुभवले. एका भागाचं सूत्रसंचालन माझ्या मुलींनी केलं होतं. तर एकदा माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर सेटवर केक घेऊन आले होते असे अनेक खास क्षण या कार्यक्रमाने मला दिले, असं सिद्धार्थने सांगितलं.

सेटवर सूत्रसंचालक म्हणून धिंगाणा घालणाऱ्या सिद्धार्थने कधीकाळी महाविद्यालयातही असाच धिंगाणा घातला होता असं सांगितलं. ‘मी महाविद्यालयात शिकत असताना एकदा पारंपरिक दिनाच्या निमित्ताने पोतराज बनून महाविद्यालयात गेलो होतो. त्या दिवशी एकेरी नृत्याचा कार्यक्रम होता. आणि मी तेव्हा ‘दार उघड आई’ या गाण्यावर नाचलो होतो. त्या वेळी मी परकरला ओढण्या बांधून, चाबूक हातात घेऊन, कपाळावर मळवट भरून महाविद्यालयात गेलो होतो. तेव्हा मी कसा दिसतोय वगैरे कधीच विचार केला नाही, मी अगदी बिनधास्तपणे वावरायचो’ अशी आठवण त्याने सांगितली. त्याच्या स्वभावातील हा बेधडकपणा आज हिंदीतही वाटचाल करत असताना त्याला कामी येतो आहे. मात्र त्या वेळी मार खाण्याचेही प्रसंग ओढवले होते, असं म्हणत त्याने एक गमतीशीर आठवण सांगितली. ‘महाविद्यालयात असताना ‘सुपारी’ ही एकांकिका आम्ही स्पर्धेसाठी केली होती. या एकांकिकेचं नंतर ‘जागो मोहन’ या नाटकात रूपांतर झालं. त्यात मी ३-४ छोटी पात्रं साकारायचो. जेव्हा स्पर्धेचा निकाल लागणार होता, त्या वेळी प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरू असताना मी अचानक उठून तिथे काहीजण फोटो काढत होते त्यांच्यात घुसलो. त्या वेळी माझ्यावर सगळे रागावले होते आणि त्यांनी मला मारायचं ठरवलं होतं, पण मला त्या वेळी उतेजनार्थ पारितोषिक जाहीर झालं आणि हा आनंद साजरा करण्याच्या नादात सगळे मला मारायचं विसरले. अशा तऱ्हेने मी त्या दिवशी थोडक्यात बचावलो’ अशी आठवण सिद्धार्थने सांगितली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor siddharth jadhav first show aata hou de dhingaana on star pravah channel zws

First published on: 29-10-2023 at 05:12 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×