बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्याच्या अभिनयासोबतच करोना काळात त्याने केलेल्या कामांमुळे चर्चेत आला आहे. आजवर त्याने बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. सोनूच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. सोनू आता लवकरच एका म्युझिक व्हिडिओत झळकणार आहे. या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक फराह खान करणार असून त्याचं शूटिंग सुरू झालं असल्याची माहिती समोर आली आहे.
सोनूने फराह खान दिग्दर्शित चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’मध्ये काम केलं आहे. त्यानंतर आता या म्युझिक व्हिडीओत ते दोघं पुन्हा एकदा काम करणार आहेत. याचं शूटिंग पंजाबमध्ये करण्यात येत आहे. आगामी म्युझिक व्हिडीओबद्दल सोनूने ‘आयएएनएस’सोबत बोलताना सांगितले की, “हे गाणं माझ्या आधीच्या कामापेक्षा खूप वेगळं आहे आणि मला फराह बरोबर काम करायला नेहमीच मज्जा येते.” या म्युझिक व्हिडीओत सोनू एका शेतकऱ्याची भूमिका दिसतो, जो पुढे जाऊन एक पोलीस अधिकारी होतो. फराह खान दिग्दर्शित हा म्युझिक व्हिडीओ महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी सोनूने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो आणि फराह खान एका ट्रॅक्टरवर बसलेले आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते दोघे सामान घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीवर बसले आहेत. ‘माझ्या बेस्टफ्रेंड सोबत हिरवा निसर्ग आणि रस्ता’ अशी कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
या म्युझिक व्हिडीओ बरोबरच सोनू २०२१ मध्ये ‘मुंबई सागा’, ‘पृथ्वीराज’, ‘आचार्य’ सारख्या अजून बऱ्याच चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसेल. दरम्यान करोना काळात अभिनेता सोनू सूद गरिबांसाठी ‘मसिहॉं’ बनला. एकीकडे देशात करोनाच्या लाटेमुळे लोकं मदतीसाठी सैरावैरा भटकत होते, तर दुसरीकडे सोनू सूद अगदी देवदूतासारखा लोकांच्या मदतीसाठी धावून आला आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये मजूरांना घरी जाण्यासाठी मदतं केली होती. सोनूने ‘सोनू सूद फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि त्या माध्यमातून तो लोकांना ऑक्सिजन सिलेंडर्सपासून सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.