कपूर घराणं हे बॉलीवूड विश्वातलं नावाजलेलं आणि प्रतिष्ठित घराणं. या घराण्याने अनेक स्टार सिनेजगताला दिले. या खानदानापैकी गेले काही पिढय़ा ज्यांनी गाजवल्या असं नाव म्हणून ऋषी कपूर यांचा उल्लेख करता येईल. एवढय़ा मोठय़ा घराण्यातून आलेला हा अभिनेता इतकीच त्यांची ओळख न राहता त्यांच्यातील अभिनय कौशल्य आणि विशेष मेहनतीच्या जोरावर त्यांनी चॉकलेट हिरो ते चरित्र अभिनेता अशी यशाची शिखरं सर केली. तुम्ही कुठल्याही घरण्यातून असलात तरी तुमच्यातील कौशल्य व क्षमता हेच शेवटी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात टिकून राहण्याची हमी देतं, हे अशा बॉलीवूड कलाकारांना कित्येकदा आपल्या संघर्षांतून सिद्ध करावं लागलं आहे. तरीही नातलगबाजी (नेपोटिझम) चा वाद बॉलीवूडमध्ये पुन:पुन्हा डोकं वर काढत राहतो. या पाश्र्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीत ‘नेपोटिझम’ला स्थान नसलं तरी तिथे मात्र कंपूशाहीची लागण झाली असल्याचं मत कलाकारांनी व्यक्त केलं आहे.

मराठीत सध्या वेगवेगळे कं पू अस्तित्वात आहेत, अशी मतं काही कलाकारांनी व्यक्त केली आहेत. एखादा चित्रपट करायचा झाल्यास पडद्यावरील कलाकारांपासून ते पडद्यामागील तंत्रज्ञांपर्यंत सर्वाना एकत्र आणावं लागतं; पण त्यातही ज्या कलाकार व तंत्रज्ञांसोबत तुमची उत्तम गट्टी जमली आहे त्यांनाच जास्त प्राधान्य देणं हेही साहजिक आहे. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ यासह अनेक चित्रपटांमध्ये सचिन खेडेकर अभिनेते आणि महेश मांजेरकर दिग्दर्शक अशी जोडी आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अभिनेता भरत जाधव व अंकुश चौधरीसोबत अनेक चित्रपट केले आहेत. सतीश राजवाडे आणि मुक्ता बर्वे यांची ‘अग्निहोत्र’ या मालिकेपासून उत्तम केमिस्ट्री आहे. त्यामुळे सतत एकत्र काम केल्याने त्यांचे कंपू तयार होणं हे साहजिक आहे. अशा पद्धतीने सातत्याने एकत्रित काम करण्याची उदाहरणं ही आजच्या काळातलीच आहेत असं नाही. याआधीही अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे या चौघांनी मराठी सिनेसृष्टीतला एक काळ गाजवला आहे. अभिनेते दादा कोंडके, अभिनेत्री उषा चव्हाण आणि संगीतकार राम लक्ष्मण या संगीतकारांनी मराठीतील अनेक पिढय़ांचं मनोरंजन केलं आहे; पण म्हणून अमुक एक कलाकार अमुक एका दिग्दर्शकासोबतच काम करतात असं म्हणत कं पूशाहीचा शिक्का मारणं किती योग्य आहे? असा प्रश्न निर्माण होतो.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

एकच एक टीम सातत्याने काम करताना पाहून प्रेक्षकही कंटाळतात, याचा अनुभव दिग्दर्शक-निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे अनेकांनी काही चित्रपटांनंतर आपली चौकट मोडून नवे कलाकार, तंत्रज्ञांबरोबरही काम केले आहे. कलाकारांनी वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे काम करणं, दिग्दर्शकांनी सातत्याने वेगवेगळ्या कलाकारांबरोबरही काम करून पाहिलं आहे. जसं मुक्ता बर्वेने दिग्दर्शक राजीव पाटील यांच्यासोबत ‘जोगवा’ हा सिनेमा केला ज्यासाठी तिला उत्तम अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. अंकुश चौधरी यांनी संजय जाधव यांच्याबरोबर ‘दुनियादारी’ हा सिनेमा केला. सचिन खेडेकर यांनी मराठीतील दिग्दर्शकांसोबत काम करताना अनेक िहदी दिग्दर्शकांसोबत कामं केली.

अनेकदा कलाकार व दिग्दर्शकांमधील सूर उत्तमरीत्या जुळल्यामुळे त्यांचा गट तयार होतो; पण त्याच वेळेला नवनवीन प्रयोगाला आणि सर्जनशीलतेला महत्त्व देऊन हे कलाकार हे ठरलेली चौकट मोडतात. यामुळे प्रेक्षकांनाही नवीन आणि नेहमीपेक्षा वेगळं पाहण्याचं समाधान मिळतं. त्यामुळे नेपोटिझम किंवा कंपूशाहीसारख्या गोष्टी अस्तित्वात असो अथवा नसोत, उत्तम मनोरंजन यावर प्रेक्षकांचा हक्क अबाधित राहिला पाहिजे!

 नेपोटिझम मराठीत निश्चितच नाही, पण कम्पूशाही आहे जे प्रत्येक क्षेत्रात असतं. मराठीत अनेक गट आहेत.

– आदिनाथ कोठारे,

 तुम्ही कोणाचीही मुलगी अथवा मुलगा असलात तरी शेवटी तुमची गुणवत्ता, तुमची बुद्धिमत्ता महत्त्वाची ठरते. नेपोटिझम तुम्हाला एखादी संधी मिळवून देऊ शकतं, पण तुमची कामगिरीच तुम्हाला या क्षेत्रात टिकवून ठेवते.

– श्रिया पिळगावकर

 इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे नेपोटिझम, कंपूशाही सगळीकडे असते. मराठी चित्रपटसृष्टीही त्याला अपवाद नाही; पण शेवटी कुठल्याही क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणं तुमच्यातील कौशल्यावरच अवलंबून असतं.

– गश्मीर महाजनी

  मी कोणत्याही गटाशी संबंधित नाही. जे काही आहे ते तुमच्यातील कलागुणांवर अवलंबून आहे. शेवटी तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावंच लागतं.

– नेहा पेंडसे,

अश्विनी पारकर, मुंबई</strong>