बॉलिवूडमध्ये सध्या रिमेक आणि चरित्रपट यांचा सुळसुळाट झाला असल्याचं दिसत आहे. त्यातूनही एखाद्या खेळाडूचा चरित्रपट हे बॉलिवूडमध्ये चांगलेच चालतात. मध्यंतरी तापसी पन्नूचा मिथाली राज या महिला क्रिकेटपटूवर चित्रपट आला होता. हा चित्रपट एवढा खास चालला नसला तरी एकंदरच क्रिकेटपटूंच्या चरित्रपटात प्रेक्षकांना प्रचंड रस असतो. आता अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील याच धाटणीचा ‘चकदा एक्सप्रेस’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.

अनुष्का शर्मा झूलन गोस्वामी या महिला क्रिकेटपटूच्या चरित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनुष्का या चित्रपटासाठी चांगलीच मेहनत घेत आहे. मध्यंतरी तिने यासाठी करत असलेल्या तयारीचा व्हिडिओ शेअर केला होता. काही महिन्यांपूर्वी तिने या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. याबरोबरच तयारीसाठी अनुष्काने इंग्लंडला जाऊन क्रिकेटचं रीतसर प्रशिक्षण घेतलं होतं. नुकतंच तिने या चित्रपटाच्या नवीन शेड्यूलच्या चित्रीकरणाची बातमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून स्टोरी पोस्ट करत अनुष्काने ही बातमी दिली आहे. शिवाय याचं पुढचं चित्रीकरण इंग्लंडमध्ये होणार असल्याचंही अनुष्काने स्पष्ट केलं आहे. झूलन गोस्वामी यांचं वैयक्तिक आयुष्य आणि क्रिकेटच्या कारकीर्दीवर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे.

आणखी वाचा : “ब्रह्मास्त्रचं नाव बदलून…” कॉमेडीयन अतुल खत्री यांची ट्विटरवरची ‘ती’ खोचक कमेंट व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुष्काने मध्यंतरी एका मुलाखतीत या चित्रपटाबद्दल खुलासा केला आहे. अनुष्का म्हणते, “महिलांना या पितृसत्ताक समाजात स्वतःचं स्थान मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. झूलन गोस्वामी हे याचं मोठं उदाहरण आहे. या चित्रपटातून आम्ही त्यांच्या संघर्षाला योग्य न्याय देऊ ही खात्री आहे.” या चित्रपटाच्या माध्यमातून अनुष्का बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शाहरुखबरोबर ‘झीरो’ या चित्रपटात अनुष्का दिसली होती. अनुष्काच्या या नवीन चित्रपटासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.