मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू यासारख्या सर्वच सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. यात अनेकांना विविध प्रकारच्या संघर्षांना सामोरे जावे लागले. नुकतंच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. “जर तुला चित्रपटात काम करायचे असेल तर तुला या चार लोकांसोबत राहावं लागेल”, असे तिने एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलेखा तळवळकर या आपल्या युट्यूब चॅनलवरुन विविध अभिनेत्रींच्या मुलाखती घेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अर्चना यांनी सिनेसृष्टीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्या म्हणाल्या, “मी जेव्हा शूटींगला जायची तेव्हा माझी बहिण सुप्रिया पाठारे ही माझ्यासोबत यायची. त्यातूनच तिला अभिनयाची संधी मिळाली. मला चार बहिणी होत्या. त्यामुळे माझे वडील मानसिकरित्या फार खचले होते. मी पाच ते सहा वर्षाची असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे मला मोठ्या कष्टाला सामोरे जावे लागले.”
रितेश देशमुखकडून तुला मिळालेलं सर्वोत्तम गिफ्ट कोणतं? जिनिलिया म्हणाली…
“मी शाळेत शिकत असताना निलकांती पाटेकर आणि सुलभा देशपांडे यांनी बालकलाकार म्हणून नाटकातून अभिनयाची संधी मिळवून दिली. माझ्या करिअरमध्ये मी सुपरस्टार होते असं काही नाही. मी सिनेसृष्टीत अगदी छोटी छोटी पात्र साकारली आहेत. मी मराठी सिनेसृष्टीत चांगली स्थिरस्थावर झाली होती. मला सिनेसृष्टीत सगळी चांगली माणसं मला भेटत गेली. त्यामुळे चांगली कामं मला मिळाली आणि माझा चेहरा ओळखला जाऊ लागला. मी कोणी मोठी सुपरस्टार वगैरे असे काही नव्हती. एकदा एका हिंदी चित्रपटासाठी माझी निवड झाली होती. तो चित्रपट खूप मोठा होता. मी त्याचे नाव सांगणार नाही. कारण नंतर त्याचे परिणाम वाईट होतील”, असे त्या म्हणाल्या.
“त्या चित्रपटासाठी दोन मुलींची निवड झाली होती. सर्व गोष्टी ठरल्या होत्या. तुमचं सगळं ओके आहे, आम्ही तुमचे मालिकेतील काम पण बघितलं आहे. तुमचे फोटो पण चांगले आहेत. तुम्ही हा चित्रपट करताय, पण या चित्रपटात काम करायचं असेल तर तुम्हाला चार दिवस या चार लोकांसोबत राहावं लागेल.’ अशी अट त्यांनी घातली होती.
“त्यावेळी माझ्यासोबत जी दुसरी मुलगी निवड झाली होती, तिने ती मान्य केली आणि ती आजच्या घडीला टॉपला आहे. ती आपल्याच बॅचची मुलगी आहे. पण मी मात्र ती नाकारली. मला निलकांती पाटेकर, सुलभा ताई यांनी अभिनयाची संधी मिळवून दिली होती. पुढेही मला सहज चित्रपट मिळत गेले. विशेष म्हणजे ही लोकं एक समज करुन घेत असतात की अशाप्रकारच्या पार्श्वभूमीतून आलेल्या मुली या आपल्यासाठी सहज उपलब्ध असतात. एखादी गरीब मुलगी लबाडच असते, असा समज त्यांचा असतो. ही समस्या मला आणि सुप्रियाला अनेकदा आली आहे. पण सुप्रिया ही फार खंबीर होती. ती कोणाला थोबाडीत द्यायलाही घाबरायची नाही”, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान अर्चना नेवरेकर यांनी मोठ्या जिद्दीने आणि हिंमतीने अर्चनाने मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली. वासूची सासू हे अर्चना यांनी साकारलेलं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. ती फुलराणी, जन्मदाता, स्वप्न सौभाग्याचे, सुना येती घरा, वहिनीची माया अशा विविध नाटकात आणि चित्रपटात त्यांनी काम केले आहे.