प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा भाऊ राहत्या घरात मृतावस्थेत आढळला आहे. ‘सस्त्र’, ‘लेव्हल क्रॉस’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री बाबिलोनाचा भाऊ विघ्नेश कुमारचं निधन झालं आहे. तो मृतावस्थेत आढळला आहे, पण त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नईतील सालीग्रामम येथील दशरथ पुरममधील एका अपार्टमेंटमध्ये ४० वर्षीय विघ्नेश एकटाच राहत होता. विघ्नेश फोन उलचत नव्हता, त्यामुळे त्याचा एक मित्र घरी पोहोचला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेशच्या घराचा दरवाजा आतून बंद होता, बराच वेळ ठोठावूनही त्याने दार उघडलं नाही. त्यामुळे त्याला संशय आला आणि त्याने तत्काळ विरुगंबक्कम पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडला. त्यांना बेडरुममध्ये विघ्नेशचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील अरकोनम तालुक्यात असलेल्या किलपक्कम गावातील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.
वनाधिकाऱ्यांनी ‘बिग बॉस’च्या घरातून स्पर्धकाला केली अटक, ‘ते’ पेंडंट ठरलं कारणीभूत
दरम्यान, विघ्नेश गेल्या अनेक वर्षांपासून या अपार्टमेंटमध्ये एकटाच राहत होता आणि त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. विघ्नेशचा मृत्यू दारूच्या व्यसनामुळे झाला की अन्य कोणत्या कारणाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. विघ्नेशची आई माया यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पूर्वीच्या वैमनस्यातून कोणीतरी त्यांची हत्या केली असावी, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस तपास चालू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तपासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून विघ्नेशचा पोलिस ठाण्यात मोठा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर अनेक गुन्ह्यांचा आरोप आहे, त्याला अनेकदा अटक झाली होती आणि तो तुरुंगातही राहिला होता.