पाकिस्तानी अभिनेत्री हुमायरा असगर कराची येथील राहत्या घरात मृतावस्थेत आढळली आहे. ‘तमाशा घर’ फेम हुमायराने अनेक पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केलं होतं. ती ३२ वर्षांची होती. हुमायराचा मृतदेह घरातच कुजला होता, तिचं निधन काही आठवड्यांपूर्वी झालं असावं, अशी माहिती समोर आली आहे.
हुमायराच्या निधनाची बातमी आल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हुमायराचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या वडिलांना व भावाला माहिती देण्यात आली, पण त्यांनी तिचा मृतदेह घेण्यास नकार दिला. अहवालांनुसार, पोलिसांनी तिच्या भावाला फोन केला तर त्याने त्याच्या वडिलांशी बोलायला सांगितलं. हुमायराचे वडील असगर अली हे लष्करातून निवृत्त झालेले डॉक्टर आहेत.
“आम्ही तिच्याबरोबरचे सगळे संबंध आधीच तोडले आहेत, त्यामुळे तुम्हाला तिच्या मृतदेहाचं काहीही करा. आम्ही तो स्वीकारणार नाही,” असं हुमायराचे वडील म्हणाले.
अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा तिच्या कुटुंबियांशी संपर्क करणार असल्याचं म्हटलंय. जर त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला तर तो बेवारस आहे, असं समजून अंत्यविधी केले जाते. हुमायराचा मृतदेह घेण्यास कुटुंबियांनी नकार दिल्याची बातमी आल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. याबद्दल नेटकरी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
हुमायरा असगरचा मृतदेह जून महिन्यापासून अपार्टमेंटमध्ये पडून होता. कुणालाच तिच्या मृत्यूबद्दल माहीत नव्हतं. घरभाड्याच्या थकबाकी संदर्भातील कोर्टाचे आदेश घेऊन ८ जुलैला पोलीस तिच्या घरी पोहोचले, मात्र घराचे दार उघडले नाही. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडला आणि आत त्यांना तिचा कुजलेला मृतदेह आढळला. हुमायराने जवळपास वर्षभरापासून घराचं भाडं भरलं नव्हतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दक्षिण कराचीच्या डेप्युटी इन्स्पेक्टर जनरलनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाच्या अवस्थेवरून असं दिसतंय की हुमायराचा मृत्यू किमान दोन ते तीन आठवड्यांपूर्वी झाला असावा. पोलीस अधिकाऱ्यांनी हुमायराच्या मृत्यूसंदर्भात घातपाताची शक्यता नाकारली आहे. तिच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, ते शवविच्छेदन अहवालातूनच समोर येईल.