बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत नवनवीन चेहरे येतच असतात. पण, काही काळानंतर चित्रपटसृष्टीतून दूर गेलेल्या या कलाकारांचे नावही कुठे ऐकू येत नाही. अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींचे इंडस्ट्रीमध्ये फार कमी आयुष्य असते. एका वयोमर्यादेनंतर अभिनेत्रींना मुख्य भूमिका मिळणं बंद होऊन जातं. आजच्या घडीला करिष्मा कपूर, प्रिती झिंटा यांसारख्या अभिनेत्री चित्रपटांमध्ये आता दिसत नाही. तर त्याउलट पन्नाशी पार केलेले अभिनेते अजूनही बॉलिवूडवर वर्चस्व गाजवत आहेत. आता आपण अशा पाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या प्रसिद्धीच्या झोतात असतानाही अचानक गायब झाल्या. या अभिनेत्री आता कशा दिसतात ते पाहूया.
ममता कुलकर्णी : बोल्ड लूकमुळे प्रसिद्धीस आलेल्या या अभिनेत्रीने ‘तिरंगा’ (१९९२) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर जवळपास २५ चित्रपटांमध्ये झळकलेल्या ममताने बॉलिवूडला सात हिट चित्रपट दिले. मात्र, २००० पासून ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दुरावली. ड्रग माफिया विकी गोस्वामी याच्यासोबत तिचे प्रेमप्रकरण असल्याचीही चर्चा होती. तसेच, या दोघांविरुद्ध अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अजामीनपत्र वॉरंटही काढण्यात आले होते.
किमी काटकर : ‘जुम्मा चुम्मा दे दे…’ गाणे तुमच्या लक्षात असेलच. या गाण्यात आपल्या अदांनी अमिताभ बच्चनला घायाळ करणाऱ्या किमी काटकरला कसं कोण विसरू शकेल. ‘टारझन’ चित्रपटातील बोल्ड लूकमुळे तर किमी विशेष नावाजली गेली. किमीची चित्रपटसृष्टीतील कारकिर्द फारच छोटी राहिली. फोटोग्राफर आणि अॅडमेकर शंतनू शोरे याच्यासोबत लग्न केल्यानंतर ती चित्रटपसृष्टीतून जणू गायबच झाली. बरीच वर्षे ऑस्ट्रेलियात राहिल्यानंतर ती आता भारतात परतली आहे.
मंदाकिनी : यामध्ये अभिनेत्री मंदाकिनीचेही नाव येते. तिचीही बॉलिवूड कारकीर्द काही वर्षांचीच होती. राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीला प्रेक्षकांनी तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहचवलं होते. या चित्रपटात तिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या बोल्ड दृश्यांवर सेन्सॉरने हरकत घेतली होती. मंदाकिनीने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.
आएशा झुल्का : नव्वदच्या दशकात आएशाचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जायचे. केवळ चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या प्रेमसंबंधांमुळेही ती तेव्हा बरीच चर्चेत होती. ‘जो जीता वही सिंकदर’मधील अंजलीच्या भूमिकेने प्रसिद्धीस आलेल्या या अभिनेत्रीने यशाच्या शिखरावर असतानाच चित्रपटसृष्टीला गुडबाय केले.
अनू अग्रवाल : ‘बस एक सनम चाहिए आशिकी के लिए..’ एकेकाळी हे गाण प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळत होतं. ‘आशिकी’ चित्रपटाने अनूला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्यावेळी अनुला मिळालेली प्रसिद्धी क्वचितच कोणत्या अभिनेत्रीला मिळाली असेल. या चित्रपटानंतर तिच्या आयुष्यात एक मोठी दुर्घटना घडली आणि तिने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने बिहारमध्ये मुलांना योगा क्लासेस देण्यास सुरुवात केली.