मराठी चित्रपट आणि मालिकांद्वारे प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी हिने नेहमीच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर चालवली आहे. तर ‘लोपामुद्रा’ या आपल्या काव्य संग्रहानेही ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीने तिच्या अभिनयासाठी पहिले रौप्य पदक पटकाविलेयं. स्पृहाने महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाटयस्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकाविले आहे.
स्पृहा जोशीचे ‘डोण्ट वरी बी हॅपी’ हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. प्रत्येक कलाकारासाठी मानाचा समजला जाणा-या राज्य शासनाच्या या पुरस्काने तिला सन्मानित करण्यात आल्याचे वृत्त स्वतः स्पृहानेच ट्विटरद्वारे दिले. स्पृहा सोशल मिडीयावर सक्रीय असून तिच्या खासगी आणि व्यावसायिक जीवनातील ब-याच गोष्टी ती आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. केवळ स्पृहाच नाही तर ‘डोण्ट वरी बी हॅपी’तील तिचा सहकलाकार असलेला अभिनेता उमेक कामत यालाही उत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर मिहीर राजदा यांना उत्कृष्ट लेखक,अव्दैत दादरकर यांना उत्कृष्ट दिग्दर्शक असे पुरस्कार मिळाले आहेत. स्पृहाला व्यवसायिक नाट्यस्पर्धेत रौप्य पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘माझं पाहिलं महाराष्ट्र राज्य व्यवसायिक नाट्यस्पर्धा रौप्य पदक..for “डोन्ट वरी बी हॅप्पी” Thank u all.Super happy,’ असे ट्विट स्पृहाने केले आहे.
लवकरचं स्पृहा आता नव्या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तिची सर्वात जवळची मैत्रीण तेजस्वीनी पंडित हिचीदेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असेल. उत्तम कलाकार असलेल्या या दोन्ही अभिनेत्रींनी याआधी ‘नांदी’ नाटकात काम केले होते. मात्र, रुपेरी पडद्यावर त्या पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress spruha joshi won silver medal for dont worry be happy play
First published on: 27-08-2016 at 11:33 IST