बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. अनेकदा तिला या गोष्टीमुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. पण स्वरा देखील शांत बसत नाही. आता स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच तिने हिंदूविरोधी एक वक्तव्य केले आहे. यात तिने “मला हिंदू असल्याची लाज वाटते,” असे म्हटले आहे. यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

स्वरा भास्करने हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी घडलेल्या एका घटनेवर मत मांडताना हिंदूविरोधी वक्तव्य केले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ स्वराने तिच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ही संपूर्ण घटना कैद झाल्याचे दिसत आहे. “एक हिंदू म्हणून मला लाज वाटते,” असे लिहित स्वराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर तिला पुन्हा ट्रोल केले जात आहे. हिंदूविरोधी वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा ट्रोलर्सने तिच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

यानंतर आता तासाभरापूर्वी स्वराने आणखी एक ट्वीट करत त्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. “काही इतर धर्मीय शांततेने प्रार्थना करत असताना जेव्हा काही गुंड देवाच्या नावाचा वापर करुन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तो माझ्या देवाचा आणि माझ्या हिंदू धर्माचा अपमान असतो. मला अशा लोकांची लाज वाटते. एक हिंदू म्हणून मला अशा लोकांची लाज वाटते. जे आमच्या देव आणि धर्मात गुन्हे करतात,” असे आणखी एक ट्वीट स्वराने केले आहे.

जेव्हा मी काही गुंड माझ्या देवाचे नाव वापरून इतर धर्माच्या लोकांना त्रास देताना पाहतो जे शांततेने प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतात, तो माझ्या देवाचा आणि माझ्या हिंदू धर्माचा अपमान आहे. मला अशा लोकांची लाज वाटते. एक हिंदू म्हणून मला लाज वाटते, ते आमच्या देव आणि आमच्या धर्मात जे गुन्हे करतात

सोशल मीडियावर ट्रोल

दरम्यान तिच्या या दोन्ही वक्तव्यानंतर सोशल मीडियावर स्वराला ट्रोल केले जात आहे. तसेच सोशल मीडियावर स्वरा भास्कर असा ट्रेंडही पाहायला मिळत आहे. यापूर्वीही स्वराने अनेकदा हिंदू-मुस्लिम या मुद्द्यांवर ट्वीट करत स्वत:ची मतं मांडली आहेत.

नेमकं प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी २२ ऑक्टोबर रोजी हरिणायातील गुरुग्राम या ठिकाणी १२-A सेक्टर मध्ये एक खासगी मालमत्ता असलेल्या ठिकाणी काही मुस्लिम शांततेत नमाज पठण करत होते. मात्र त्याचवेळी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी तिथे विनाकारण गर्दी केली. यावेळी जमलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्याचे बोललं जात आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे या परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी काही पोलिस अधिकारीही तिथे बॅरिकेट्स लावून तैनात असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वराने हाच व्हिडीओ शेअर करत हिंदूविरोधी वक्तव्य केले होते.