विद्या बालनची मुख्य भूमिका असणारा ‘बेगम जान’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वत्र जोरदार चर्चा रंगत असणाऱ्या चित्रपटाला झारखंड सरकारने करमुक्त केले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असून त्यांनी चित्रपटाचे निर्माते महेश भट्ट यांना ५० लाखांचा धनादेश सुपूर्द करत चित्रपट करमुक्त केल्याची घोषणा केली.
दिग्दर्शक श्रीजित मुखर्जीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन विद्या बालनचा आगामी चित्रपट झारखंडमध्ये करमुक्त केल्याचे ट्विट केले आहे. झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी हा चित्रपट करमुक्त केल्याची घोषणा केली. तसेच त्यांनी २ कोटींची सुट दिल्याचे ते म्हणाले.

रघुबर यांनी देखील या चित्रपटासंदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “निर्माता महेश भट्ट आणि अभिनेत्री विद्या बालन यांनी आज रांची येथे भेट घेतली. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण झारखंडमध्ये करण्यात आले आहे. चित्रीकरणादरम्यान कलाकारांना मिळालेल्या सोयीसुविधांमुळे टीम आनंदी आहे. झारखंडमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.” विद्याने झारखंडच्या ‘झारक्राफ्ट’ उत्पादनाची प्रसिद्धी करणयास तयारी दर्शविली असल्याचा उल्लेख देखील त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.

‘बेगम जान’ या चित्रपटाची प्रदर्शापूर्वीपासूनच चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटातील विद्याचा लूक आणि चित्रपटातील गाणी सध्या प्रेक्षकांची दाद मिळवत आहेत. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. झारखंड सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सध्या विद्याच्या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी धमाका केला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. झारखंड राज्याप्रमाणे इतर राज्यात देखील चित्रपटाला काही सवलती मिळतील का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.