कलाविश्वातील काम करणाऱ्या सेलिब्रिटींना बाहेरच्या जगाची किती माहिती असते याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो. सामान्य नागरिकांना जितकी बाहेरच्या जगाबद्दल माहिती असते तितकी त्यांना असते का? अहो, संपूर्ण जगाचं सोडा पण निदान आपल्या देशात काय घडामोडी घडत आहेत याची तरी माहिती असते का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आल्यावाचून राहत नाही. पण, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला नक्कीच मिळेल असं वाटतं. बहुतेकांना असं वाटतं की आपल्या झगमगाटीच्या जगाशिवाय कलाकारांना दुसर काहीच दिसत नाही. खरंतर तसं नाहीये. बरेचसे कलाकार मंडळी बाहेरच्या जगात काय घडतंय याची बित्तंबात ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता आदीनाथचंच बघा ना. त्याने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवरून आभार मानले आहेत.

वाचा : हा कॉमेडियन चक्क ३२० कोटींच्या संपत्तीचा मालक

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून अनेक गोष्टी घडल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. स्वच्छ भारत अभियान, सुकन्या समृद्धी योजना असो किंवा आता जवळपास सहा महिन्यांपूर्वी झालेला नोटाबंदीचा निर्णय असो. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे देशवासियांनी आदर राखला आणि त्यांना पाठिंबाही दिला. पंतप्रधान तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर होते. त्यात यांच्या वेळेच्या नियोजनाचे कौशल्य पुन्हा एकदा दिसून आले. सुमारे ९६ तासांचा हा दौरा होता आणि या दौऱ्यातील ३३ तास मोदींनी विमानात काढून कमी वेळेत तीन देशांचा दौरा पूर्ण केला. विशेष म्हणजे या दौऱ्यात मोदींनी ३३ कार्यक्रम आणि बैठकांमध्ये सहभाग घेत त्यांच्या कार्यशैलीची झलक दाखवली. त्यांच्या कार्यशैलीचे अनेकांनी कौतुक केले आहे. वेळेचे नियोजन कसे करावे याचा उत्तम नमुनाच जणू त्यांनी दाखवला आहे. त्यांच्या या कार्यशैलीबद्दल अभिनेता आदिनाथ कोठारेने आदर व्यक्त केला आहे. ‘मोदींचा ३ देशांचा दौरा, ३३ तास विमानात’ या आशयाची बातमी ट्विट करत आदिनाथने हात जोडून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.

वाचा : …जेव्हा श्रीदेवीची मुलगी डान्स ऑडिशन देते

पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ जून रोजी पोर्तुगाल, अमेरिका व नेदरलँड्स या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले होते. या दौऱ्यात मोदींनी पोर्तुगालचे पंतप्रधान अँतोनिओ कोस्टा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रूट यांची भेट घेतली. ९६ तासांमध्ये ३ देशांमधील सुमारे ३३ कार्यक्रम आणि बैठकांमध्ये ते सहभागी झाले. नेदरलँड आणि अमेरिकेत मोदींनी भारतीयांशीदेखील संवाद साधला. पाच दिवस आणि चार रात्रींचा हा दौरा होता. यातील दोन रात्र मोदी विमानातूनच प्रवास करत होते. पोर्तुगाल आणि नेदरलँडमध्ये त्यांनी रात्रीचा मुक्काम करणे टाळले. मोदींनी रात्रीच्या वेळेचा उपयोग प्रवासासाठी केला. या वेळेत ते दुसऱ्या देशांमध्ये जायचे.