सोशल मीडियावर वारंवार चित्रपटांवरून, जाहिरातींवरून, वेब सीरिजवरून वाद सुरु असलेला पाहायला मिळतो. विविध कारणांमुळे अनेक चित्रपटांविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. सध्या लॉकडाउनमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणारे चित्रपट जास्त अडचणीत येताना दिसत आहेत. दरम्यान सध्या अशाच एका सीरिजमुळे नेटफ्लिक्सला (Netflix) सोशल मीडियावरच्या रोषाचा सामना करावा लागतो आहे. माणसाच्या नऊ भावनांवर आधारित नऊ वेगवेगळ्या कथा मांडणारी ‘नवरस’ ही सिरीज नेटफ्लिक्सवर शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता रिलीज झाली आणि लगेच ट्विटरवर #BanNetflix ट्रेंड सुरु झाला. नेटफ्लिक्सने आपल्या या सीरिजमधील एका कथेसाठी तामिळ वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीवरून हा वाद पेटला आहे. यावरुन मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. सर्वप्रथम रझा अकादमी या संस्थेने यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

मणिरत्नम यांची नवरस ही सिरीज ६ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. मात्र, यानंतर यावर प्रेक्षकांकडून विविध संमिश्र अशा प्रतिक्रिया मिळाल्या. सर्वप्रथम रझा अकादमीने, एका तामिळ वृत्तपत्र असलेल्या Daily Thanthi मध्ये नेटफ्लिक्सच्या या सिरीजमधील एका कथेच्या जाहिरातीसाठी कुराणमधील आयत वापरल्याबद्दल ओटीटी प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच पेटलं. प्रदर्शित होताच ट्विटरवर #BanNetflix ट्रेंड सुरु झाला. नेटिझन्सने देखील या जाहिरातीवरून मायक्रो ब्लॉगिंग साईटवर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. ही जाहिरात सिद्धार्थ आणि पार्वती यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या इनमाई नावाच्या या कथेशी संबंधित होती. रथिंद्रन आर प्रसाद यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

Navarasa च्या ‘या’ कथेत दिसणार सई ताम्हणकर

‘नवरस’ ही सिरीज राग, करूणा, धैर्य, द्वेष, भीती, आनंद, प्रेम, शांती आणि आश्चर्य या माणसाच्या ९ भावभावनांवर आधारित आहे. याच ९ वेगवेगळ्या कथांपैकी एका कथेत मराठामोळी अभिनेत्री सई ताम्हणकरची अदाकारीही पहायला मिळणार आहे. मात्र, ही वेब सिरीज प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडली आहे. या वेब सिरीजमुळे नेटफ्लिक्सवर बंदी घालण्याची मागणी केली जात असून #BanNetflix हा टॉपिक ट्रेण्ड होताना दिसतो आहे.

रझा अकादमीच्या ट्विटनंतर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया

रझा अकादमी या संस्थेने ट्विटरवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई करण्याची मागणी करताना असं लिहिलं आहे कि,”नेटफ्लिक्सने Daily Thanthi या वृत्तपत्रात नवरस सिरीजमधील एका कथेच्या जाहिरातीत कुराणमधील एक आयत प्रकाशित केला आहे. हा कुराणचा अपमान आहे. आम्ही नेटफ्लिक्स विरोधात कडक कारवाईची मागणी करतो.” मुस्लिम समाजातील अनेक युझर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटफ्लिक्सवर बंदी घालण्याच्या मागणीसह त्यांच्या सर्जनशीलतेचा देखील निषेध केला आहे. दरम्यान, यापूर्वीही अशा अनेक वेब सीरिजबाबत असा मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता.

OTT प्लॅटफॉर्मवर वारंवार भावनांशी खेळ होत असल्याचा आरोप

अनेकांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “चित्रपटांमध्ये सतत इस्लामला लक्ष्य केलं जात आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर वारंवार भावनांशी खेळ केला जात आहे. हा प्लॅटफॉर्म सतत विविध समाजातील लोकांच्या भावना दुखावत आहेत.” या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेता पुन्हा एकदा चित्रपटामुळे वातावरण पेटण्याची शक्यता आहे. ज्या कथेच्या जाहिरातींवरून हा संपूर्ण वाद निर्माण झाला आहे ती ‘इनमाई’ ही कथा माणसांमधील भीतीच्या भावनेवर भाष्य करते. तामिळ भाषेत असलेल्या या कथेमध्ये सिद्धार्थ आणि पार्वती मुख्य भूमिकेत आहेत. तर विजय सेतुपति, सुरिया, अरविंद स्वामी, नागा शौर्य, रेवती यासारखे अनेक प्रसिद्ध कलाकार देखील दिसणार आहेत.