तब्बल १० वर्षांनंतर ‘अग्निहोत्र २’ ही लोकप्रिय मालिका नव्या कथेसह स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होतेय. अग्निहोत्रच्या पहिल्या पर्वामध्ये तीन पिढ्यांना जोडणारं सूत्र प्रेक्षकांना अनुभवता आलं होतं. त्यामुळे ‘अग्निहोत्र २’ मध्ये नेमकी कोणती गोष्ट उलगडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्गज कलाकार, उत्तम कथेची गुंफण आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन अशा गोष्टी जुळून आल्यामुळे ‘अग्निहोत्र’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यातच अग्निहोत्र २चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसापूर्वी ‘अग्निहोत्र २’ चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यानंतर आता या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला. त्यामुळे मालिकेविषयीची उत्सुकता आणखी वाढवलीय. प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे यांच्यासोबत रश्मी अनपट दिसून येत आहे. या मालिकेत ती अक्षरा ही व्यक्तीरेखा साकारत आहे.

‘अग्निहोत्र २’ मध्ये काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. या मालिकेत मी अक्षरा ही व्यक्तीरेखा साकारतेय. अतिशय शांत, साधी सरळ आणि आपल्या तत्वांशी ठाम असणारी ही मुलगी आहे. अक्षराच्या वडिलांच्या बाबतीत एक घटना घडलीय ज्याचा संबंध वाड्याशी आहे. अक्षराला पडलेल्या याच प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी ती अग्निहोत्री वाड्यात येणार आहे. ही गोष्ट नव्या पिढीची असल्यामुळे पहिलं पर्व जरी प्रेक्षकांनी पाहिलेलं नसलं तरी हरकत नाही. ‘अग्निहोत्र २’ ची गोष्ट आणि त्यातली अनेक रहस्य तुम्हाला नक्कीच आवडतील,’ असं रश्मीने सांगितलं.


आजही अग्निहोत्र मालिकेविषयी आणि मालिकेतल्या पात्रांविषयी प्रेक्षकांमध्ये जिव्हाळा आहे. पहिल्या पर्वातलं अग्निहोत्री कुटुंब आणि आठ गणपतींच्या रहस्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘अग्निहोत्र २’ मध्ये नव्या पिढीची नवी गोष्ट आणि सप्तमातृकांचं रहस्य उलगडेल. या सप्तमातृकांच्या रुपात दिसतील सात अभिनेत्री. या सात अभिनेत्रींपैकी एक असेल अक्षरा म्हणजेच रश्मी अनपट. पहिल्या पर्वात महादेव अग्निहोत्रींची भूमिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी साकारली होती. कर्करोगासारख्या आजारावर मात करत ‘अग्निहोत्र २’ मध्येही शरद पोंक्षे त्यांच्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज आहेत.

‘अग्निहोत्र १’चे दिग्दर्शन अभिनेते-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केले होते. तर ‘अग्निहोत्र २’चं दिग्दर्शन भीमराव मुडे करणार असून कथा श्रीरंग गोडबोले यांची आहे. अग्निहोत्र धगधगतं ठेवण्यात नवी पिढी यशस्वी होणार का? काय असेल सप्तमातृका आणि नाशिकच्या वाड्याचं रहस्य? या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा ‘अग्निहोत्र २’ मधून होईल. २ डिसेंबर पासून रात्री १० वाजता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agnihotra 2 marathi serial coming soon on star pravah new promo relase ssj
First published on: 14-11-2019 at 14:08 IST