वॉल्ट डिझ्नी यांची निर्मिती असलेला ‘मॅलेफिसेंट’ हा चित्रपट २०१४ साली जगभरामध्ये लोकप्रिय झाला होता. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचं सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मॅलेफिसेंट: मिस्ट्रेस ऑफ इविल’ हा चित्रपट हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन चित्रपटातील मॅलेफिसेंट या मुख्य भूमिकेला तिचा आवाज देणार आहे. त्यासाठी ऐश्वर्या हिंदीमध्ये डबिंग करणार आहे. या चित्रपटामध्येही एंजेलिना जोलीच मॅलेफिसेंटची भूमिका वठविणार आहे.

भारतीय प्रेक्षकांमध्ये ऐश्वर्या राय-बच्चनची अफाट लोकप्रियता आहे. त्यासोबतच या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये मॅलेफिसेंटसाठी ऐश्वर्याचा आवाज योग्य असल्याचं मानण्यात येत आहे. त्यामुळे डबिंगसाठी ऐश्वर्याची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये ऐश्वर्याचा आवाज ऐकू येत असून ऐश्वर्याने पहिल्यांदाच हॉलिवूडमधील एका चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी आवाज डब केला आहे.  दरम्यान, २०१४ मध्ये आलेल्या या चित्रपटामध्ये एंजेलिनासोबत एले फानिंग, इमेल्डा स्टाऊंटन, ज्युनो टेंपल यांची मुख्य भूमिका होती. हा एक डार्क फॅन्टसी चित्रपट असून यात एक परिकथा दाखविण्यात आली आहे.