सरबजीत सिंगच्या जिवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून ऐश्वर्या राय बच्चन या चित्रपटात सरबजीतची बहिण दलबीर कौरची भूमिका साकारताना दिसणार आहे.

या चित्रपटात ऐश्वर्याचा लुक नक्की कशाप्रकारे असेल हे निश्चित करण्यात आलेले नाही. दलबीर कौर यांचे पात्र सत्यघटनेवर आधारित आहे. त्यामुळे हे पात्र साकारण्यासाठी आवश्यक अशा पैलूंचा अभ्यास करुन ऐश्वर्याच्या भूमिकेला अंतिम रुप देण्यात येईल अशी माहिती या चित्रपटाचे निर्माते झैशान काद्री यांनी दिली. इंडो-एशिअन वृत्तसंस्थेने अलिकडेच याबाबतचे वृत्त प्रसारित केले असून येत्या जूलै महिन्यात चित्रपटातील ऐश्वर्याचा लुक निश्चित करण्याच्या दृष्टीने चाचणी घेण्यात येणार आहे. दिग्दर्शक आेमंग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील. तसेच पंजाबमध्ये हा चित्रपटात चित्रीत करण्यात येईल.

दहशतवाद आणि पाळत ठेवणे तसेच लाहोर आणि फैसलाबाद येथे झालेल्या बाँब हल्यात सहभागी असल्याच्या आरोपावरुन सरबजीतला पाकिस्तान उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतू त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान शिक्षा भोगत असताना तुरुंगातील कैद्यांनी केलेल्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या सरबजीतचा येथील जीन्हा इस्पितळात मृत्यू झाला होता.