बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने काल मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्यासोबत एका खास भोजन समारंभाला हजेरी लावली होती. यावेळी लाल रंगाच्या बनारसी साडीत ऐश्वर्याचे सौदर्यं कमालीचे खुलून दिसत होते. फ्रान्स्वा ओलांद यांना यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ओलांद काल सकाळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राजपथावरील संचलनाला उपस्थित होते. त्यानंतर भारतातील फ्रान्सचे राजदूत फ्रान्स्वा रिचियर यांनी ओलांद यांच्या सन्मानार्थ मुंबईत एका खास मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीसाठी ऐश्वर्याला निमंत्रण देण्यात आले होते. सूत्रांच्या माहितीनुसार फ्रान्स्वा ओलांद यांनी या कार्यक्रमात ऐश्वर्या रायची अत्यंत अगत्यपूर्वक चौकशी केली. या दोघांनी चित्रपट आणि कान फेस्टिवल या विषयांवरही गप्पा मारल्या. ऐश्वर्या सध्या ‘सरबजित’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र ओलांद याच्या विनंतीला मान देण्यासाठी ऐर्श्वयाने तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढूनला स्नेहभोजनाला उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमाला अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव व्यक्ती म्हणून ऐश्वर्या याठिकाणी उपस्थित होती. ही गोष्ट ऐश्वर्यासाठी अत्यंत गौरवाची बाब असल्याचे मानले जात आहे. कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलला हजेरी लावणाऱ्या ऐश्वर्याने पॅरिसमध्येच ‘पिंक पँथर २’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. याशिवाय, फ्रान्समधील ‘नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्टस अँड लेटर्स’ हा नागरी पुरस्कार मिळवणारी ऐश्वर्या राय एकमेव बॉलीवूड नायिका आहे.