शास्त्रीय संगीताचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘आकाशवाणी’ने आठवडय़ाचे सातही दिवस व २४ तास सुरू असलेली ‘रागम्’ ही वाहिनी काही महिन्यांपूर्वी सुरू केली आहे. या वाहिनीच्या माध्यमातून आकाशवाणीच्या संग्रहात असलेला शास्त्रीय संगीताचा खजिना शास्त्रीय संगीतप्रेमी आणि श्रोत्यांसाठी खुला झाला आहे. तसेच खास नवे कार्यक्रमही या वाहिनीवरून सादर होत आहेत..

शास्त्रीय संगीत हे काही ठरावीक वर्गापुरतेच आहे असा एक समज काही वर्षांपूर्वी होता. सर्वसामान्यांना शास्त्रीय संगीतातील ‘राग’प्रकरण कळत नसल्यामुळे संगीतातील हा प्रकार ‘दुबरेध’ असल्याचा समज (की गैरसमज) आपल्यापैकी अनेकांनी करून घेतला. चित्रपट संगीत, भावसंगीत, नाटय़संगीत हे ज्या प्रमाणात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आणि लोकप्रिय झाले त्या तुलनेत शास्त्रीय संगीत एका ठरावीक वर्गापुरतेच मर्यादित राहिले हे वास्तव आहे. मात्र तरीही केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात शास्त्रीय संगीतात रुची असणारी रसिक मंडळी आहेत हे नाकारून चालणार नाही. पाश्र्वगायन किंवा तालवाद्य संगीत क्षेत्रात आज दिग्गज असलेले अनेक गायक किंवा कलाकारांनाही शास्त्रीय संगीताचे महत्त्व माहिती आहे. त्यामुळेच पाश्र्वगायन क्षेत्रात येण्यापूर्वी ‘शास्त्रीय संगीता’चा पाया भक्कम असणे अत्यंत गरजेचे आहे, असे अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. ‘शास्त्रीय संगीत’ ही संगीताला भारताने दिलेली मोठी देणगी असून भारतीय संगीतात या संगीत प्रकाराचे महत्त्वप्रू्ण योगदान आहे.

Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
study of psychology, digital campaigning in elections
निवडणुकांतील डिजिटल प्रचारतंत्रामागे मानसशास्त्राचा अभ्यास

शास्त्रीय संगीताच्या या अमूल्य ठेव्याचे जतन ‘आकाशवाणी’ने केले आहे, किंबहुना गेल्या अनेक वर्षांपासून ते काम ‘आकाशवाणी’ करते आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण आकाशवाणीने सुरुवातीपासून ते अगदी आजच्या काळातही आपल्या परीने शास्त्रीय संगीत जतन आणि संवर्धनाचे काम केले आहे. बदलत्या काळात नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत आकाशवाणीने ‘शास्त्रीय संगीत’ प्रसाराचे काम अव्याहतपणे सुरू ठेवले आहे.

एकेकाळी ‘आकाशवाणी’ हे प्रभावी माध्यम होते. मात्र दूरदर्शनच्या प्रसारामुळे ‘आकाशवाणी’ मागे पडली. स्मार्ट भ्रमणध्वनी, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडिया, संगणक आणि दूरचित्रवाहिन्यांच्या आक्रमणाच्या काळात ‘आकाशवाणी’ कोण ऐकणार असे समजले जात असताना ‘एफ.एम.’ रेडिओच्या माध्यमातून आपल्यापासून दूर गेलेल्या श्रोत्यांना पुन्हा एकदा ‘आकाशवाणी’कडे वळविण्यात यश मिळविले आहे. शास्त्रीय संगीताचा प्रसार, जतन आणि संवर्धनासाठी ‘आकाशवाणी’ने स्मार्ट भ्रमणध्वनीवर किंवा ‘डीटीएच’वर चालू शकेल आणि ऐकता येईल अशी ‘रागम्’ ही वाहिनी काही महिन्यांपूर्वी सुरू केली आहे. आठवडय़ाचे सातही दिवस व २४ तास चालणारी आणि संपूर्णपणे शास्त्रीय संगीताला वाहिलेली ‘श्राव्य’ माध्यमातील ही पहिलीच वाहिनी आहे. व ती सुरू करण्याचे श्रेय नक्कीच ‘आकाशवाणी’ला आहे. ‘आकाशवाणी’च्या ‘रागम्’ या वाहिनीचे प्रसारण आणि संचालन बंगलोर येथून होत असले तरी देशातील सर्व संगीतप्रेमी रसिकांना भ्रमणध्वनीसाठी तयार केलेल्या ‘एआयआर लाइव्ह’ या अ‍ॅपवरून किंवा ‘डीटीएच’वरूनही याचे प्रसारण ऐकता येणे शक्य आहे. ‘अँडॉइड’ आणि ‘विंडोज्’ या ऑपरेटिंग प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्ट भ्रमणध्वनीवरील ‘प्ले स्टोअर’वरती हे अ‍ॅप उपलब्ध आहे. हजारो शास्त्रीय संगीतप्रेमी, शास्त्रीय संगीताचे अभ्यासक, विद्यार्थी आणि श्रोत्यांनी  हे ‘अ‍ॅप’ आपापल्या भ्रमणध्वनीवर ‘डाअनलोड’ करून घेतले आहे. भ्रमणध्वनीवरील या ‘अ‍ॅप’चे वैशिष्ठय़ म्हणजे ‘रागम्’ वाहिनीवरील कार्यक्रम ऐकण्यासाठी ‘हेडफोन’ची गरज नाही. ‘अ‍ॅप’ डाउनलोड केल्यानंतर ‘रागम्’वर क्लिक केले की स्पीकरवर ‘रागम्’चा आनंद घेता येतो.

भारतीय शास्त्रीय संगीतात हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत असे दोन मुख्य प्रकार आहेत. हिंदुस्थानी संगीत हे प्रामुख्याने उत्तर भारत तर कर्नाटक संगीत हे प्रामुख्याने दक्षिण भारतातून उदयास आले आणि विकसित झाले. शास्त्रीय संगीतातील विविध घराणी आणि गायकांनी शास्त्रीय संगीत समृद्ध केले आहे. आकाशवाणीने पहिल्यापासूनच या दोन्ही संगीत प्रकाराला नेहमीच उत्तेजन दिले आहे. शास्त्रीय संगीतातील या दोन्ही प्रकारांतील अनेक घराण्यांतील दिग्गज गायकांनी ‘आकाशवाणी’साठी आपला ‘आवाज’ दिला आहे. या सर्व मान्यवरांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रित खजिना आकाशवाणीकडे ‘अर्काइव्ह’च्या माध्यमातून उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वी ‘आकाशवाणी’ने ध्वनिफितीच्या माध्यमातून हा दुर्मिळ ठेवा संगीतप्रेमी रसिकांसाठी सशुल्क खुला केला होता. आजही मुंबईसह देशातील प्रमुख आकाशवाणी केंद्रांवर या ध्वनिफिती रसिकांना उपलब्ध आहेत. आजही अनेकांना त्याची फारशी माहिती नाही. पण आता ‘रागम्’मुळे शास्त्रीय संगीत अनेकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे.

पं. भीमसेन जोशी यांनी १९६५ मध्ये आकाशवाणीसाठी गायलेला राग तोडी व ललित भटियार, हिराबाई बडोदेकर यांनी गायलेला चंद्रकंस व बागेश्री, पं. दि. वि. पलुस्कर यांच्या आवाजातील राग तोडी, किशोरी आमोणकर यांच्या आवाजातील सावनी नट व रागेश्री, माणिक वर्मा यांनी गायलेला छायानट व मालकंस असे दुर्मिळ ध्वनिमुद्रण ‘आकाशवाणी’कडे उपलब्ध आहे. शास्त्रीय संगीतातील दिग्गज ते नवोदित यापैकी बहुतांश सगळ्यांनी आपला ‘आवाज’ आकाशवाणीसाठी दिला आहे. दिग्गज तालवाद्य वादकांनीही आपले योगदान ‘आकाशवाणी’साठी दिले आहे. हा सगळा खजिना आकाशवाणीत आहे.

‘आकाशवाणी’च्या ‘रागम्’चा चांगला प्रसार झाला आहे. या वाहिनीच्या माध्यमातून आकाशवाणीच्या संग्रहात असलेला शास्त्रीय संगीताचा खजिना शास्त्रीय संगीतप्रेमी आणि श्रोत्यांसाठी खुला झाला आहे. काही खास नवे कार्यक्रमही या वाहिनीवरून सादर होत आहेत. नव्या पिढीत शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करण्यासाठी आणि जुन्या पिढीतील मंडळींना ‘स्मरणरंजन’ म्हणून ‘रागम्’चे खूप महत्त्व असून त्याचे सर्व श्रेय ‘आकाशवाणी’लाच आहे.