विनोदवीर कपिल शर्माला ओळख निर्माण करुन देणारा ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हा रिअॅलिटी शो आठ वर्षानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर परततोय. सध्याच्या घडीला टेलिव्हिजनवर अनेक रिअॅलिटी शोची चलती असल्यामुळे या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेच्या दृष्टीने निर्मात्यांनी खास काळजी घेतल्याचे दिसते. कारण या रिअॅलिटी शोचे परीक्षक म्हणून त्यांनी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला पसंती दिली आहे. एखाद्या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची अक्षयची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तो रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, बॉलिवूडमधील अनेक चित्रपटातून प्रेक्षकांना हसवल्यानंतर तो पहिल्यांदाच छोट्यापडद्यावरील कॉमेडीच्या व्यासपीठावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अक्षयची कॉमेडी हिरो म्हणून असणारी लोकप्रियता लक्षात घेऊनच ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या निर्मात्यांनी अक्षय कुमारला पसंती दिल्याचे समजते. या कार्यक्रमात तो मुख्य परीक्षकाची धूरा सांभाळताना दिसेल. त्याच्यासोबत आणखी तीन सहाय्यक परीक्षक देखील असतील. यामध्ये निश्चितच एक महिला परीक्षक प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. मात्र, त्यासाठी निर्माते कोणत्या चेहऱ्याला पसंती देतील हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिगबॉस या कार्यक्रमातून लोकप्रिय ठरलेल्या एली अवरामला या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. यापूर्वीच्या सत्रात पेरिजाद कोलह आणि सोनाली नागराणी यांनी कार्यक्रमाचे होस्ट केले होते. तर नवज्योतसिंग सिद्धू आणि शेखर सुमन ही जोडी परीक्षक म्हणून दिसली होती.
२००७ मध्ये कॉमेडी रिअॅलिटी शो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ चा विजेता ठरलेला कपिल आताच्या घडीला कॉमेडीच्या व्यासपीठावरील बादशाह आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या खिलाडीच्या सहभागामुळे ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’चे नवे पर्व कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ ला चॅलेंज ठरणार का? हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरेल.