बॉलिवूडच्या सर्वांच्याच आवडत्या खिलाडी कुमारने नुकतात्याचा वाढदिवस साजरा केला. सहसा कामात व्यस्त असणाऱ्या अक्षयने यंदा त्याचा वाढदिवस कुटुंबासमवेत साजरा केला. मालदिव बेटांवरील नैसर्गिक सौंदर्याच्या सान्निध्यात त्याने पत्नी ट्विंकल, मुलगा आरव आणि मुलगी नितारासह काही निवांत क्षण घालवले. खाजगी आणि कौटुंबिक क्षणांची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्याच्या बाबतीत अक्षय काहीसा मागे असला तरीही यावेळी मात्र त्याने तसे केले नाही. खिलाडी कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन मालदिवचे काही सुरेख फोटो शेअर केले आहेत.
एक साजेसे कॅप्शन देत अक्षयने ट्विट केलेल्या या फोटोमध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब एकमेकांचे हात पकडून पाठमोरे दिसत आहेत. वाढदिवशी इतर कलाकारांप्रमाणे पार्टी करण्याला प्राधान्य न देता यंदा अक्षयने त्याचा वेळ त्याच्या कुटुंबासाठी दिला होता. ट्विंकल आणि अक्षय या दोघांनीही त्यांचे फोटो ट्विट करत काही सुरेख कौटुंबिक क्षण चाहत्यांसमवेत शेअर केले.
खिलाडी कुमारचा यंदाचा वाढदिवस या त्याच्यासाठी खास ठरला असणार यात शंकाच नाही. ‘एअरलिफ्ट’, ‘रुस्तम’ यांसारख्या चित्रपटांमधून दमदार अभिनय करत अक्षयने अनेकांचीच मने जिंकली आहेत. ‘रुस्तम’ या चित्रपटात त्याने साकारलेला नौदल अधिकारी अनेकांना भावला. अक्षयच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन पाहता व्यावसायिक जीवनात व्यस्त असूनही तो त्याच्या कुटुंबालाही समप्रमाणात प्राधान्य देतो हेच स्पष्ट होत आहे. सध्या बॉलिवूडचा खिलाडी कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. न्यायालयीन व्यवस्थेवर चुरचुरीत भाष्य करणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘जॉली एलएलबी’ सिनेमाचा हा सिक्वेल आहे. २०१३ मध्ये ‘जॉली एलएलबी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला होता. ‘जॉली एलएलबी’मध्ये अभिनेता अर्शद वारसी हा मुख्य भूमिकेत होता, मात्र सिक्वेलमध्ये अर्शदऐवजी यंदा अक्षय कुमारचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या धाटणीच्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणाऱ्या अक्षय कुमारकडे अनेकांचे लक्ष लागून राहीले आहे.
Soaking in all the goodness of the sun & the sea,one last stroll before we bid goodbye.Maldives you will be missed! pic.twitter.com/1iMpnjVJq3
— Akshay Kumar (@akshaykumar) September 12, 2016