निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट काही कारणास्तव रद्द करावा लागला तरी अभिनेत्री आलिया भट्टसोबत ते ‘गंगुबाई’ या चित्रपटात काम करणार आहेत. आलियासोबत काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करत आहेत. एकीकडे ‘गंगुबाई’ चित्रपटात रणबीर कपूरने आलियासोबत काम करण्यास नकार दिल्याच्या चर्चा असतानाच आता या चित्रपटात कार्तिक आर्यनची वर्णी लागल्याचं कळतंय. मात्र याबाबत अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही.
गेल्या काही दिवसांपासून कार्तिकला भन्साळींच्या ऑफीसबाहेर पाहिलं जात आहे. त्यामुळे आलियासोबत त्याची जोडी पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसं झाल्यास कार्तिक-आलिया ही नवी जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळेल.
‘गंगुबाई’ हा चित्रपट गंगुबाई कोठेवाली यांच्या जीवनावर आधारित आहे. मुंबईच्या इतिहासात गंगुबाई या कामाठीपुराच्या मॅडम या नावाने ओळखल्या जातात. हा चित्रपट हुसैन जैदी यांची कादंबरी ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’वर आधारित आहे.
कार्तिकच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो ‘पती पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये झळकणार आहे. त्याचसोबत इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल’च्या सीक्वलमध्येही त्याची मुख्य भूमिका आहे. यासोबतच ‘दोस्ताना २’मध्ये तो जान्हवी कपूरसोबत काम करणार असून ‘भुल भुलैय्या २’मध्येही तो प्रमुख भूमिकेत आहे. तर दुसरीकडे आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’, ‘RRR’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.