रशियामध्ये दहशत पसरवणाऱ्या ‘ब्ल्यू व्हेल’ या एका ऑनलाइन खेळाचा भारतात पहिला बळी गेला. अंधेरी पूर्व येथील ‘शेर ए पंजाब’ वसाहतीत राहणाऱ्या मनप्रीत सिंग या चौदा वर्षांच्या विद्यार्थ्यांने शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आत्महत्या केली. ‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाइन खेळामुळेच त्यानं आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. यानंतर सामान्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही याविषयी चिंता व्यक्त केली.
यासंदर्भात अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून चिंता व्यक्त करत एक ट्विट केले. ‘एका धोकादायक ऑनलाइन गेमसंदर्भात बातमी वाचली. जीवन हे जगण्यासाठी आहे, वेळेआधीच संपवण्यासाठी नाही,’ असं बिग बींनी ट्विट केलंय. तर आमिर खाननंही त्याच्या आगामी ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान मनप्रीतच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. ‘इंटरनेटचे फायदे आणि नुकसानही आहेत. जर त्याचा योग्यप्रकारे उपयोग न केल्यास त्यापासून नुकसान होण्याची शक्यता असते. आपल्या मुलांना योग्य शिक्षण देण्याची आई- वडील, कुटुंबिय आणि शिक्षकांची जबाबदारी आहे,’ असं आमिरने म्हटलं.
T 2504 – Reading alarming news on a dangerous internet game being played by the young ! Life is given to live not give it up before time ! pic.twitter.com/Ibhw5KtebE
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 2, 2017
वाचा : काय?.. बनारसी पानाचं नाव ‘शाहरुख खान’!
काय आहे हा ‘ब्लू व्हेल चॅलेंज’?
‘ब्ल्यू व्हेल’ खेळामुळे रशियामध्ये तब्बल १०० हून अधिक मुलांनी आत्महत्या केली होती. या खेळात प्लेअर्सला ५० वेगवेगळी आव्हानं दिली जातात. म्हणजे एखादा हॉरर मुव्ही बघणं किंवा स्वत:ला जखमी करून घेणं वगैरे आणि प्रत्येक आव्हान पूर्ण झालं की त्याचा पुरावा प्लेअर्सला द्यावा लागतो. या खेळाचा शेवटचा टप्पा असतो आत्महत्या करण्याचा. जर प्लेअर्सने ते आव्हान पूर्ण केलं नाही तर त्यांना धमकीचे मेसेजही येतात, असेही इंग्लंडमधल्या अनेक वेबसाईट्सने म्हटले आहे. दुर्दैव म्हणजे एकदा का हा खेळ डाऊनलोड केला की तो डिलिट किंवा अनइन्स्टॉलही करता येत नाही असंही एका इंग्रजी वेबसाईटने म्हटले होते. यामुळे युजर्सची पर्सनल माहिती देखील हॅक होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.