करोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. परंतु या प्रतिकूल परिस्थितीतही डॉक्टर, पोलीस, वैद्यकिय कर्मचारी, अग्निशामक दल स्वत:चे प्राण धोक्यात घालून आपलं संरक्षण करत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी यांनी या मंडळींना ‘सामाजिक योद्धा’ असं म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी ‘डॉक्टर’, ‘सफाई कर्मचारी’, पोलीस अशा शब्दांपासून तयार करण्यात आलेले श्री गणेशाचे एक चित्र पोस्ट केले आहे. “ही आहेत खरी देवमाणसं” अशा आशयाची कॉमेंट त्यांनी या फोटोवर लिहिली आहे. बिग बींनी पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी करोनापासून सुरक्षित राहण्याचे सोपे उपाय देशवासीयांना सांगितले होते.

  • खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवा.
  • एकदा वापरलेला टिश्यू पेपर पुन्हा वापरु नका. वापरलेला टिश्यू पेपर बंद झाकणाच्या पेटीत टाका
  • डोळे, नाक आणि तोंडाला सतत हात लावू नका.

  • आपले हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवा
  • गरज नसताना घराबाहेर पडू नका
  • जर खोकला, सर्दी किंवा ताप असल्याचे जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे उपचारासाठी जा. इतरांपासून अंतर ठेवून राहा. जेणेकरुन तुमच्या आजारांची लागण इतरांना होणार नाही.
  • अधिक माहितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ०११ २३९७८०४६ किंवा १०७५ या क्रमांकावर संपर्क साधा