भारतीय सिनेसृष्टीत विनोदी कलाकारांना फारसे महत्व दिले जात नाही. नेहमीच त्यांच्या वाट्याला दुह्यम दर्जाच्या भूमिका येतात. परंतु अभिनेता मेहमूद यांनी पडोसन, बॉम्बे टू गोवा, कुवारा बाप, गुमनाम यांसारख्या चित्रपटांमधून या दुह्यम भूमिकेंच्या परंपरेला छेद देत तुफान लोकप्रियता मिळवली. जबदस्त अभिनय, विनोदी शैली आणि अवाक् करणारे हावभाव याच्या जोरावर प्रचंड नावलौकीक मिळवणारे मेहमूद यांचा आज ८७ वा वाढदिवस आहे.

मेहमूद जितके जबरदस्त अभिनेता होते तितकेच उत्तम दिग्दर्शकही होते. बॉलिवूडचे महानायक यांच्या कारकिर्दीची खरी सुरवात त्यांच्यामुळेच झाली होती. १९६९ साली अमिताभ बच्चन कामाच्या शोधात असताना मेहमूद यांनी अमिताभ यांना आपल्या ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली होती. हा पहिलाच चित्रपट होता ज्यात बिंग बींनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. जबरदस्त विनोदाने भरलेल्या या चित्रपटाने कमाल केली. हा चित्रपट त्याकाळी सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर अमिताभ यांना मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळू लागली. हा किस्सा स्वत: अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितला होता.

बॉलिवूड सिनेसृष्टीत ‘किंग ऑफ कॉमेडी’ म्हणून नावलौकीक मिळवणारे मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी झाला होता. मेहमूद यांचे वडील मुमताज अली बॉम्बे टॉकिजमध्ये काम करायचे. घराच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मेहमूद मालाड ते विरार दरम्यान चालणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चॉकलेट देखील विकायचे. परंतु अभिनयाची प्रचंड आवड आणि जबरदस्त महत्वाकांक्षा यांच्या जोरावर अखेर त्यांनी सिनेसृष्टीत प्रचंड नावलौकीक मिळवले.