सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर देखील टाय झाली. अशा या थरारक लढतीत सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या प्रमाणावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. ICC च्या या सुपर ओव्हरच्या नियमावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. अशातच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर ICC च्या नियमांवर भन्नाट विनोद शेअर केला आहे.

‘तुमच्याकडे २००० रुपये, माझ्याकडेही २००० रुपये, तुमच्याकडे २००० रुपयांची एक नोट, माझ्याकडे ५००च्या चार नोटा, कोण अधिक श्रीमंत?..ICC – ज्याच्याकडे ५००च्या चार नोटा आहेत तो श्रीमंत,’ अशी उपरोधिक पोस्ट बिग बींनी शेअर केली आहे. क्रिकेट जाणकारांनी आणि चाहत्यांनी ICC च्या नियमावलीवर टीकेची झोड उठवली आहे.

आणखी वाचा : बापरे! प्रभासच्या ८ मिनिटांच्या अॅक्शन सीनसाठी निर्मात्यांनी खर्च केले इतके कोटी रुपये

ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनीदेखील या नियमांबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘धोनीच्या ग्लोव्ह्जऐवजी मूर्खपणाचा सुपर ओव्हरचा नियम बदला,’ असं त्यांनी ट्विट केलं होतं. हिटमॅन रोहित शर्मानेही ICC च्या नियमांबद्दल नाराजी व्यक्त केली. रोहितशिवाय माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ, युवराज सिंग जाणीव गौतम गंभीर यांनीही या नियमांवर प्रश्न उपस्थित केले.