बॉलीवूडचा आघाडीचा ‘फूल टू एण्टरटेनर’ अर्थात रोहित शेट्टीच्या सर्वाधिक गाजलेल्या ‘सिंघम’चा सिक्वेल तयार होऊ घातला आहे. परंतु ‘आता माझी सटकली’ म्हणणारा खलनायक प्रकाश राज त्यात दिसणार नाही. त्याची जागा घेतोय, सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि ‘कमिने’तला खलनायक अमोल गुप्ते. ‘सिंघम २’चा खलनायक म्हणून अमोलची निवड झाली आहे.
सुरुवातीला रोहित शेट्टीने याबाबत अमोलला विचारणा केली तेव्हा रोहित काही तरी थट्टा करतोय असे अमोलला वाटले होते. परंतु, अमोलने हे आव्हान पेलायचे ठरविले आहे. सिक्वेल असला तरी खलनायक संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा असेल अशी आशा करायला हरकत नाही. कारण खलनायकी भूमिकेला निरनिराळ्या लकबी, छटा असल्याशिवाय अमोल गुप्ते सहजी भूमिका स्वीकारणार नाही हे ओघाने आलेच. मुळात दिग्दर्शक असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या दिग्दर्शकाच्या नेतृत्वाखाली काम करायचे असते तेव्हा निश्चितपणे भूमिकेचे वेगळेपण असणे अपेक्षितच असते.
‘सिंघम २’चा खलनायक साकारण्यासाठी अमोल गुप्तेला १५-१६ किलो वजन वाढविण्यास रोहित शेट्टीने बजावले आहे. त्यामुळे अमोल गुप्तेची बायको दीपा भाटिया आता आपले खास सिंधी पदार्थ नवऱ्याला खायला घालून चांगली धष्टपुष्ट खलनायक बनविण्यासाठी झटते आहे, असे खुद्द अमोल गुप्तेनेच सांगितले. बायकोच्या हातची तेलातुपातली पक्वान्ने खाऊन अमोलचे वजन एव्हाना आठ किलोंनी वाढले आहे. अजून त्याला जवळपास तेवढीच मजल मारायची आहे.
‘सिंघम २’मध्ये अजय देवगण कायम असला तरी त्याची नायिका करिना कपूर असेल. प्रकाश राजचा ‘जयकांत शिखरे’ लोकप्रिय ठरला होता. किंबहुना या भूमिकेमुळे प्रकाश राजला हिंदीत मानाचे स्थान मिळाले होते. आता अमोल गुप्ते खलनायक साकारणार असल्यामुळे त्याची आणि प्रकाश राजची तुलना अपरिहार्यपणे होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2014 रोजी प्रकाशित
अमोल गुप्ते ‘सिंघम २’चा खलनायक
बॉलीवूडचा आघाडीचा ‘फूल टू एण्टरटेनर’ अर्थात रोहित शेट्टीच्या सर्वाधिक गाजलेल्या ‘सिंघम’चा सिक्वेल तयार होऊ घातला आहे.
First published on: 21-01-2014 at 10:57 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol gupte will play villain role in singham