देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट तिकीटबारीवर नवीन नवीन विक्रम करत असतानाच दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कापरी यांनी ट्विटवरुन गुजरात फाइल्स चित्रपट बनवण्यास आपण तयार असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. या ट्विटची फारच चर्चा झाली. मात्र आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराने खरोखरच गुजरात फाइल्स चित्रपट बनवण्याची मागणी केलीय.

नक्की वाचा >> The Kashmir Files वरुन शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, “भाजपाच्या पाठबळामुळेच…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होण्याआधी पत्रकारांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांना काश्मीर फाइल्ससंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हा चित्रपट म्हणजे हिंदुंचा प्रपोगांडा रेटण्यासाठी आणि मुस्लीम द्वेष पसरवणारा असल्याची टीका केली. तसेच त्यांनी यावेळी गुजरात फाइल्स चित्रपट बनवला पाहिजे असंही म्हटलं. “कश्मीर फाइल्सच्या नावाखाली राजकारण भारतीय जनता पार्टी करतेय ते साफ चुकीचं आहे. कश्मीर फाइल्स हा हिंदुत्वाचा अजेंडा आहे. तो का सुपर हिट होतोय तर मोहन भागवत बोलले, नरेंद्र मोदीजी बोलले म्हणून कश्मीर फाइल्स हिट होतोय. बाकी त्या चित्रपटातून प्रेरणा घ्यावी असं काही नाहीय,” असं मिटकरी म्हणाले.

नक्की वाचा >> “‘द काश्मीर फाइल्स’ पाहताना इंटरव्हलनंतर माणूस झोपी जातो”; राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला

तसेच पुढे बोलताना त्यांनी, ““परवा एक भाजपाचे आमदार माझ्यासोबत एका वृत्तवाहिनीवर चर्चासत्रामध्ये होते. त्यांनी सांगितलं तुम्ही झुंड टॅक्स फ्री करु शकता कश्मीर फाइल्स का नाही? म्हणजे भाजपाच्या मनामध्ये झुंड चित्रपटाबद्दल जो आकस आहे, द्वेष आहे त्याचा मी थोडा पाठपुरावा केला. अमिताभ बच्चनसारखा मोठा सेलिब्रिटी डॉक्टर बाबासाहेब अंबेडकरांच्या पाया लागतो हे काय भाजपाच्या लोकांना खटकलंय का याचा शोध घेतला पाहिजे,” असंही मिटकरींनी म्हटलं आहे. “झुंडचा इतका तिरस्कार का आणि कश्मीर फाइल्सचा इतका पुळता का? मी तर म्हणतो आगामी काळात पिक्चर सुपर डुपर हिट करायचा असेल तर गुजरात फाइल्स नावाचा चित्रपट काढला गेला पाहिजे,” असा टोलाही लगावला.

नक्की पाहा >> Photos: ‘द कश्मीर फाइल्स’चे समर्थक-विरोधक रितेशवर संतापले; कोणी ‘नेत्याचा मुलगा’ म्हटलं तर कोणी ‘झुंड’वरुन सुनावलं

“झुंडमधून आम्ही प्रेरणा घेऊ शकतो. झोपडपट्टीमधील मुलं राष्ट्रीय स्पर्धा कशी गाजवू शकतात हे नागराज मंजुळेंनी सांगितलंय त्यातून काही प्रेरणा तरुण घेऊ शकतात. कश्मीर फाइल्समध्ये फक्त आणि फक्त मुस्लीम द्वेष आहे आणि आपलं सोयीचं राजकारण एवढाच भाजपाचा उद्देश आहे,” अशी टीका मिटकरींनी केलीय.

नक्की वाचा >> ‘२०२४ चा इलेक्शन स्टंट’, ‘मुस्लिमांनाही मारलं’, ‘BJP नेही आमच्यासाठी…’; The Kashmir Files बद्दल काश्मिरी पंडितांची मतं

गुजरात फाइल्ससाठी दिगदर्शकाने मागितलेली परवानगी
“गुजरात फाइल्स नावाचा मी ‘तथ्यांवर तसेच कलेवर आधारित’ चित्रपट बनवण्यास तयार आहे. यामध्ये तुमच्या भूमिकेचाही ‘सत्यतेने’ आणि सविस्तर उल्लेख असेल. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून तुम्ही थांबवणार असं आश्वासन नरेंद्र मोदीजी तुम्ही मला आज देशासमोर देऊ शकता का?”, असा प्रश्न कापरी यांनी पंतप्रधांना ट्विटमध्ये टॅग करुन विचारलाय.

नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”

निर्मातेही तयार फक्त…
त्यानंतर काही तासांनी कापरी यांनी पुन्हा एक ट्विट केलं असून काही निर्मात्यांनी आपल्यासोबत ‘गुजरात फाइल्स’वर काम करण्याची तयारी दर्शवल्याचं म्हटलंय. “माझ्या या ट्विटनंतर काही निर्मात्यांसोबत माझं बोलणं झालं. ते गुजरात फाइल्सची निर्मिती करण्यासाठी तयार आहेत. त्यांना केवळ एवढं आश्वासन हवं आहे की ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बोलत आहेत तेच स्वातंत्र्य या चित्रपटाला दिलं जाईल,” असं कापरी यांनी म्हटलंय.

पंतप्रधान ‘द कश्मीर फाइल्स’संदर्भात नेमकं काय म्हणाले?
दिल्लीमध्ये मंगळवारी (१५ मार्च २०२२ रोजी) पार पडलेल्या भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी सत्य गोष्टी समोर आल्या पाहिजेत हे सांगताना ‘द कश्मीर फाइल्स’ आणि त्याला होणाऱ्या विरोधाचं उदाहरण दिलं. मोदींनी या चित्रपटाला विरोध करणारे लोक इतर वेळेस अभिव्यक्ती स्वासंत्र्याचे झेंडे घेऊन मिरवत असतात असा टोलाही लगावला. “तुम्ही सध्या पाहिलं असेल की ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. जे लोक नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन फिरतात, ती पूर्ण जमात मागील पाच-सहा दिवसांपासून खवळलेली आहे,” असा टोला मोदींनी लगावला.

“सत्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न…”
“तथ्य आणि कला म्हणून या चित्रपटाचे विवेचन करण्याऐवजी त्याचं श्रेय हेरावून घेण्यासाठी एक मोहीम सुरु करण्यात आलीय. तुम्ही पाहिलं असेल, यासाठी एक पूर्ण इकोसिस्टीम काम करतेय. सत्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय,” असं पंतप्रधान या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले.

नक्की वाचा >> The Kashmir Files च्या मुद्द्यावरुन नितेश राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचा पाठिंबा; म्हणाले, “हा चित्रपट…”

“सत्य वाटलं ते सादर केलं…”
तसेच पुढे बोलताना पंतप्रधानांनी, “त्याला (निर्माता, दिग्दर्शकाला) जे सत्य वाटलं ते त्याने सादर करण्याचा प्रयत्न केला. पण त्या सत्याला न समजण्याची तयारी, ना स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे. उलट जगाने हा (चित्रपट) पाहू नये असे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या पद्धतीचे षडयंत्र मागील पाच-सहा दिवसांपासून सुरु आहे,” असं म्हटलं.

नक्की वाचा >> विश्लेषण : चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे काय होतं? तिकिटांचे दर कमी होतात का?; फायदा कोणाला होतो?

“त्यांना कोणी नाही म्हटलंय?”
“माझा विषय काही चित्रपट नाहीय. माझा विषय आहे की, जे सत्य आहे ते देशाच्या हितासाठी समोर आणलं पाहिजे. त्या सत्याचे अनेक पैलू असू शकतात. एखाद्याला एखादी गोष्ट दिसते तर एखाद्या दुसरी गोष्ट दिसते. ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी आपला दुसरा चित्रपट बनवावा. त्यांना कोणी नाही म्हटलंय?,” असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केलाय. यानंतर उपस्थित खासदारांनी टाळ्या वाजवून मोदींच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला.

“विरोध करणारे हैराण झालेत…”
“मात्र ते (चित्रपटाला विरोध करणारे) हैराण झालेत की जे सत्य एवढ्या वर्ष दाबून ठेवलं ते तथ्यांच्या आधारे बाहेर आणलं गेलं, कोणीतरी मेहनत करुन ते बाहेर आणलं जात आहे तर ते थांबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत,” असंही मोदींनी खासदारांशी संवाद साधताना म्हटलंय.

असे चित्रपट बनायला हवेत…
पंतप्रधानांनी हा चित्रपट फार उत्तम असल्याचं सांगितलं. तसेच अशाप्रकारचे आणखी चित्रपट निर्माण केले पाहिजेत अशी इच्छाही पंतप्रधानांनी बोलून दाखवली. “द कश्मीर फाइल्स हा फार चांगला चित्रपट आहे. तुम्ही सर्वांनी तो पाहिला पाहिजे. असे चित्रपट आणखी बनले पाहिजेत. अशा चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे,” असं पंतप्रधानांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं.

मोदींची भेट
१२ मार्च रोजी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी, चित्रटाचे निर्माते अभिषेक यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळीही मोदींची चित्रपटाचं कौतुक केलं होतं आणि चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari slams the kashmir files says gujrat files will be major hit if movie is made scsg
First published on: 21-03-2022 at 14:03 IST