बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अमृता राव हिचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. काही मोजक्या चित्रपटांच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री विवाह चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. मात्र, त्यानंतर तिला कलाविश्वातील वावर कमी झाला. परंतु, अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिच्याविषयी विविध चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच आता अमृता लवकरच आई होणार असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

सध्या सोशल मीडियावर अमृताचा एक फोटो व्हायल होत असून यात तिचं बेबीबंप दिसत आहे. अमृता तिच्या पतीसोबत म्हणजे आरजे अनमोलसोबत एक क्लिनिक बाहेर पडताना या फोटोमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनमोल आणि अमृता पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहे. मात्र, याप्रकरणी सध्या दोघंही मौन बाळगून आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, करीना कपूर-खान, अनुष्का शर्मा यांच्यानंतर आता अमृतादेखील आई होणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. अमृता आणि अनमोलने २०१६ मध्ये लग्न केलं. त्यापूर्वी जवळपास ७ वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. अमृताने २००२ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ‘इश्क-विश्क’, ‘विवाह’ या चित्रपटांमुळे ती प्रकाशझोतात आली. या दोन्ही चित्रपटात तिने शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. तसंच तिने ‘मैं हूँ ना’, ‘सत्याग्रह’, ‘मस्ती’, ‘वाह लाइफ हो तो एैसी’, ‘प्यारे मोहन’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘विक्ट्री’, ‘लाइफ पार्टनर’, ‘जॉली एलएलबी’, ‘सिंह साहेब द ग्रेट’, ‘शौर्य’ यासारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.