बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अमृता राव लवकरच आई होणार आहे. अमृताने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी अमृताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अमृताचं बेबीबंप दिसून येत होतं. मात्र, त्याविषयी अमृताने मौन बाळगलं होतं. परंतु, आता तिने स्वत: फोटो शेअर करत आई होणार असल्याचं सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृताचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. काही मोजक्या चित्रपटांच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री ‘विवाह’ चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. मात्र, त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. परंतु, अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनमोल आणि अमृता पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहे.


“तुमच्या सगळ्यांसाठी हा दहावा महिना असेल. पण, आमच्यासाठी हा नववा महिना आहे. सरप्राईज. मी आणि अनमोल नवव्या महिन्याच्या आनंदात आहोत. आम्ही खरंच फार आनंदी आणि उत्साही आहोत. लवकरच गोड बातमी देऊ”, अशी पोस्ट अमृताने शेअर केली आहे.

वाचा :  Video : ‘डीडीएलजे’मधील पलट सीन आठवतोय? आहे ‘या’ हॉलिवूडपटातील कॉपी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमृताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये अमृता तिच्या पतीसोबत म्हणजे आरजे अनमोलसोबत एक क्लिनिक बाहेर पडताना दिसली होती. अमृता आणि अनमोलने २०१६ मध्ये लग्न केलं. त्यापूर्वी जवळपास ७ वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. अमृताने २००२ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ‘इश्क-विश्क’, ‘विवाह’ या चित्रपटांमुळे ती प्रकाशझोतात आली. या दोन्ही चित्रपटात तिने शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. तसंच तिने ‘मैं हूँ ना’, ‘सत्याग्रह’, ‘मस्ती’, ‘वाह लाइफ हो तो एैसी’, ‘प्यारे मोहन’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘विक्ट्री’, ‘लाइफ पार्टनर’, ‘जॉली एलएलबी’, ‘सिंह साहेब द ग्रेट’, ‘शौर्य’ यासारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amrita rao is pregnant flaunting her baby bump in latest photo ssj
First published on: 20-10-2020 at 08:35 IST