‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम गेल्या साडे पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. या कार्यक्रमाचा प्रेक्षक फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून जगभरात आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे होतं असते. तसंच या कार्यक्रमातील कलाकार देखील नेहमी चर्चेचा विषय असतात. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता प्रसाद खांडेकरच्या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

काही दिवसांपूर्वी ५ मेला अभिनेता प्रसाद खांडेकरचा वाढदिवस झाला. त्याने वाढदिवस आपल्या कुटुंबियांसह मित्र मंडळीबरोबर साजरा केला. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर प्रसादने खास पाणीपुरी पार्टी ठेवली होती. याचे फोटो, व्हिडीओ इतर कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या खास दिवशी शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या कलाकारांचे, चाहत्यांचे आभार मानण्यासाठी प्रसादने नुकतीच पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – “ऋजुता लग्न झालं तरी साडी नेसत नाही का?” चेतन वडनेरेला चाहत्याने बायकोसंदर्भात विचारला प्रश्न, अभिनेता सडेतोड उत्तर देत म्हणाला…

प्रसादने वाढदिवसा दिवशीचे खास क्षणाचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “नमस्कार, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ५ मेला माझ्या वाढदिवसादिनी तुम्ही सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा मला पाठवल्या…योगायोगाने ५ मे हा जागतिक हास्यदिन म्हणून सुद्धा साजरा केला गेला…यामुळे आनंद द्विगुणित झाला…तुम्ही भरभरून पाठवलेले केक्स, गिफ्ट्स आणि बुकेज शुभेच्छा सगळं व्यवस्थित पोहोचलं. रात्री १२ वाजता केक कापून सुरू झालेला वाढदिवस…वाड्या काकाच्या फोनपासून प्रवास करत हास्यजत्राच्या सेटवर पाणीपुरी पार्टी करत आणि रात्री घरच्याबरोबर डिनर, दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता परत केक कापून संपवला…”

“वाढदिवसादिनी आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी काम करायला मला खूप आवडत सो यंदा ही ५ तारखेला हास्याजत्राचं शूट करत असल्यामुळे थोडा व्यग्र होता. पण जमेल तेवढं प्रत्येकाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न केला…ज्यांना केला नसेल त्यांचे आभार मानतो आणि एकच प्रार्थना करेन असाच आशीर्वाद व प्रेम ठेवा…तुमचं हे प्रेम आणि शुभेच्छा प्रचंड ऊर्जा, समाधान आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. देव सगळ्यांना खुश ठेवो,” असं प्रसादने लिहिलं आहे.

हेही वाचा – “संधीचं सोनं करणं म्हणजे…”, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने नम्रता संभेरावच्या ‘नाच गं घुमा’मधील कामाचं केलं भरभरून कौतुक, म्हणाला…

प्रसाद खांडेकरची ही पोस्ट चांगली चर्चेत आली असून अजूनही चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. दरम्यान, याआधी प्रसाद व नम्रता संभेरावचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या व्हिडीओतून प्रसादने नम्रताचा बदला घेतला होता.